ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा; हालेपवर मात करून वोझ्नियाकी विजेती

मेलबर्न – रुमानियाच्या अग्रमानांकित सिमोना हालेपची कडवी झुंज तीन सेटच्या संघर्षानंतर मोडून काढताना डेन्मार्कच्या द्वितीय मानांकित कॅरोलिना वोझ्नियाकीने येथे सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीच्या विजेतेपदाला गवसणी घातली. वोझ्नियाकीचे हे पहिलेच ग्रॅंड स्लॅम विजेतेपद ठरले.

“ग्रेट डेन’ या टोपणनावाने टेनिसविश्‍वात प्रसिद्ध असलेल्या द्वितीय मानांकित कॅरोलिना वोझ्नियाकीने अग्रमानांकित हालेपचा 7-6, 3-6, 6-4 असा पराभव करताना आपले दीर्घकाळचे स्वप्न अखेर साकार केले. त्याआधी हालेपने जर्मनीच्या 21व्या मानांकित अँजेलिक कर्बरचे कडवे आव्हान मोडून काढले होते. तर वोझ्नियाकीने रुमानियाच्या बिगरमानांकित एलिसे मेर्टेन्सची झुंज सरळ सेटमध्ये संपुष्टात आणताना अंतिम फेरीची निश्‍चिती केली होती. तसेच या दोन्ही खेळाडूंनी अंतिम फेरीकडे वाटचाल करताना किमान एकदा मॅचपॉइंट वाचविला होता.

-Ads-

परंतु अंतिम सामन्यात उभय खेळाडूंनी आपले कौशल्य पणाला लावले. रॉड लेव्हर कोर्टवरील हवामान पुन्हा एकदा अत्यंत उष्ण आणि दमट बनले असताना आव्हानात्मक परिस्थितीत दोन्ही खेळाडूंनी इच्छाशक्‍ती पणाला लावल्याचे दिसले. अखेर हालेपचा बॅकहॅंड जाळ्यात गेला आणि वोझ्नियाकीने रॅकेट उंचावीत आपला विजय साजरा केला. अमेरिकन ओपनमध्ये उपविजेतेपद पटकावणाऱ्या वोझ्नियाकीसाठी हा विजय जितका आनंदाचा होता, तितकाच फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत दोनदा पराभव पत्करावा लागलेल्या हालेपसाठी हा पराभव किती वेदनादायक असेल याची कल्पना करता येत होती.

हालेपने याआधी 2014 आणि 2017 असा दोन वेळा फ्रेंच ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. तसेच तिने टूर फायनल्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत 2014मध्ये स्थान मिळविले होते. परंतु या तीनही वेळा तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. वोझ्नियाकीने 2009 आणि 2014 अशा दोन वेळा अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत स्थान मिळविले होते. मात्र तिने गेल्याच वर्षी प्रतिष्ठेची टूर फायनल्स स्पर्धा जिंकून कारकिर्दीत पहिले महत्त्वाचे विजेतेपद पटकावले होते.

या विजयामुळे वोझ्नियाकी तब्बल सहा वर्षांनंतर महिला एकेरी विश्‍वक्रमवारीत अग्रस्थानावर झेप घेणार आहे. याआधी तिने 2010 ते 2012 या कालावधीत 67 आठवडे हा मान मिळविला होता. परंतु गेल्या सहा वर्षांत तिला एकही ग्रॅंड स्लॅम जिकता आला नव्हता. आता वयाच्या 27व्या वर्षी तिने ही कामगिरी केली आहे आणि त्याचे बक्षीसही तिला मिळणार आहे. तसेच वोझ्नियाकीने तब्बल 43 ग्रॅंड स्लॅम स्पर्धांमधील सहभागानंतर पहिला मुकुट पटकावला आहे. महान टेनिसपटू बिली जीन किंग हिच्या हस्ते वोझ्नियाकीला विजेतेपदाचा करंडक प्रदान करण्यात आला.

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)