ऑस्ट्रेलियन ओपन: कश्‍यप, श्रीकांत यांची मुख्य स्पर्धेत धडक

ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सेरीज बॅडमिंटन

सिडनी, दि. 20 – पारुपल्ली कश्‍यप आणि किदंबी श्रीकांत या भारताच्या गुणवान युवा बॅडमिंटनपटूंनी चमकदार विजयांची नोंद करताना येथे सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन सुपर सेरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या मुख्य फेरीत धडक मारली. महिला एकेरीत भारताच्या ऋत्विका शिवानी गड्डेने मुख्य स्पर्धेत स्थान मिळविण्याचा पराक्रम केला.

दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या कश्‍यपने पहिल्या पात्रता लढतीत चीनच्या झाओ जुनपेंगचा 21-15, 21-18 असा पराभव केला. तर दुसऱ्या पात्रता लढतीत इंडोनेशिया स्पर्धेतील उपविजेत्या साकाई काझुमासावर 21-5, 21-16 अशी सहज मात करीत मुख्य स्पर्धेत स्थान मिळविले. परंतु पहिल्याच फेरीत त्याच्यासमोर कोरियाच्या विश्‍वक्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या सोन वान हो याचे आव्हान आहे.

श्रीकांतने पहिल्या पात्रता लढतीत ऑस्ट्रेलियाच्या जेकब स्कुलरचा 21-15, 21-8 असा सहज पराभव केला. तर दुसऱ्या पात्रता फेरीत तैपेईच्या चुन वेई चेनचे आव्हान 21-15, 23-21 असे मोडून काढताना त्याने मुख्य स्पर्धेत धडक मारली. त्याच्यासमोर सलामीच्या फेरीत कान चाओ यू याचे आव्हान आहे.

ऋत्विकाने पहिल्या पात्रता फेरीत ऑस्ट्रेलियाच्या सिल्व्हियाना कुर्नियावानवर 21-15, 21-15 अशी मात केली, तर दुसऱ्या फेरीत रुविंडी सेरासिंघेचा 21-9, 21-7 असा धुव्वा उडविला. चोंग वेई ली आणि लोंग चेन यांना चकित करणाऱ्या प्रणयला थेट मुख्य स्पर्धेत स्थान मिळाले असून त्याच्यासमोर इंग्लंडच्या राजीव औऐसेफचे आव्हान आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)