ऑफिस स्पेसमध्ये गुंतवणूक करताना….

प्रत्येक व्यक्तीला उत्पन्नाचे पर्यायी साधन हवे असते. जर दुर्दैवाने नोकरी गमावली किंवा अन्य कारणाने काम करण्यास सक्षम राहिले नाही तर आपल्या कुटुंबाची परवड होऊ नये यासाठी नोकरीबराबेरच अन्य स्रोतांचीदेखील चाचपणी काही मंडळी करत असतात. अशा स्थितीत मालमत्तेतील गुंतवणूक हे उत्पन्नाचे उत्तम पर्यायी स्रोत मानले जाते. अर्थात, अनेकांकडे मालमत्ता असते, परंतु गरजेच्या वेळी त्याची विक्री होऊ शकत नाही, असेही उदाहरण आपण पाहतो. अशा स्थितीत ऑफिस स्पेसमध्ये गुंतवणूक ही निश्‍चित उत्पन्नाचा स्रोत म्हणून ठरू शकते.

नियमित उत्पन्नाचे स्रोत : ऑफिस स्पेसमध्ये गुंतवणुकीचा सर्वात मोठा लाभ हा निवासी मालमत्तेच्या तुलनेत अधिक भाडे मिळणे हा असतो. निवासी मालमत्तेतून साधारणपणे दीड ते अडीच टक्के फायदा मिळतो. त्याचे आणखीही अनेक लाभ आहेत. भविष्यात आपण स्वत:च काम करू इच्छित असाल तरीही ऑफिस स्पेसमध्ये केलेली गुंतवणूक आपल्याला निश्‍चितच फायदेशीर ठरू शकते. जर आपण 40-50 ओलांडल्यानंतर नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय किंवा कन्सल्टंसी सेवा सुरू करू इच्छित असाल तर आपल्याला ऑफिस स्पेस खरेदी करणे किंवा भाड्याने घेण्याची गरज भासणार नाही. कारण आपल्याकडे अशा प्रकारची मालमत्ता अगोदरपासूनच असते. म्हणून आपण कोणतेही भाडे न देता सहजपणे ऑफिस स्पेसचा वापर करू शकता.

-Ads-

जोखमीची शक्‍यता : ऑफिस स्पेससाठी खरेदी केलेली जागा कधी कधी दीर्घकाळ भाडेकरूअभावी रिकामी राहू शकते. यासाठी आपल्याला देखभालीचा खर्चही उचलावा लागतो. ऑफिस स्पेसला रेंटल इन्कमची अर्थव्यवस्था जोडलेली असते. जर एखादी इमारत आयटी-आयटीइएस ग्राहकांसाठी केली असेल अणि हा उद्योग मंदीतून जात असेल तर आपल्याला भाडेकरू शोधणे कठीण जाते. आपल्याला कदाचित भाडेही कमी करावे लागते. अनेकदा तर लिज रिन्यूअलच्या वेळी भाडे वाढवणेदेखील शक्‍य होत नसते. बहुतांश निवासी मालमत्ता या बॅंक कर्जाच्या मदतीने खरेदी केल्या जातात. जर आपण ऑफिससाठी मालमत्ता खरेदी करत असाल तर आपल्याला बॅंकेतून कर्ज घेताना देखील अडचण येऊ शकते. मालमत्तेसाठी भाडेकरू नसल्याने आणि अन्य एक मालमत्ता मॉर्गेजसाठी उपलब्ध नसल्याने बॅंकेकडून कर्ज मिळणे कठीण बाब ठरू शकते.

खरेदीचा पर्याय : ऑफिस स्पेसला विविध टप्प्यावर खरेदी करता येऊ शकते. इमारतीचे बांधकाम सुरू असताना किंवा पूर्ण झालेले असताना किंवा तयार झाल्यानंतर रिकामे असताना किंवा भाडेकरू आल्यानंतरही ऑफिस स्पेसची जागा खरेदी करू शकता. अर्थात बांधकाम अवस्थेतील दुकानाची किंवा ऑफिस स्पेसची खरेदी ही फायद्याची ठरू शकते. या काळात किमती बऱ्यापैकी कमी असतात. पैशाची जमवाजमव करण्यासाठी देखील पुरेसा वेळ मिळतो. दीर्घकाळात या मालमत्तेला चांगली किंमत येऊ शकते. या टप्प्यात जोखीमही वाढते. अनेकदा विकासक वेळेत आपले प्रकल्प पूर्ण करत नाहीत. म्हणूनच त्यापासून फायदा होण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागते. ऑफिस स्पेससाठी जागा खरेदी करताना काही पथ्ये पाळली पाहिजेत. दळणवळणाची व्यवस्था, बाजारपेठ, परिसरातील विकासकामे पाहूनच जागा खरेदी करावी. जेणेकरून भाडेकरू मिळण्यास फारशा अडचणी येणार नाहीत. अन्यथा ही गुंतवणूक जोखमीची बनू शकते.

– अनिकेत प्रभुणे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)