ऑनलाईन सातबारा प्रक्रिया गतिमान होण्याची गरज

शिरूर-संपूर्ण शिरूर तालुक्‍यात ऑनलाईन अपडेट कामाच्या प्रक्रियेत तसेच शेतकऱ्यांना सारखाच लागणारा सातबारा, 8अ चा उतारा घेण्यासाठी सायबर कॅफेत तासन्‌तास उतारा शोधण्यात वेळ लागत असल्याने तसेच तलाठ्यांनाही वारंवार वेबसाईटच्या प्रतीक्षेत राहावे लागत असल्यामुळे शेतकऱ्यांसह तलाठीसुद्धा त्रस्त आहेत. यामागील गौडबंगाल नक्की काय आहे, हेच कोणाला समजत नसल्याने हा घोळात घोळ सुरू आहे. मात्र याचा नाहक त्रास नागरिकांना होत आहे.
ऑनलाईनच्या कामामुळे तलाठ्यांना कामाचा बोजा कमी होईल असे वाटले होते; मात्र अपडेटिंगची कामे उर्वरित असल्यामुळे असे अडथळे येत असलेले समोर आले आहे. सातबाऱ्यावर बऱ्याच चुका असल्यामुळे काम पूर्ण करण्यासाठी तासन्‌तास कधीकधी दिवस बसून सर्व्हरमुळे कामे अपूर्ण राहतात त्यातच ऑनलाईन साताबाऱ्यामुळे शेतकरी येऊन तलाठ्यांना जाब विचारतात. बोजा चढवणे, उतरवणे, खरेदीची नोंद नाही होत नाही असे असंख्य प्रश्न करतात. सर्व्हर डाऊन असल्यास असंख्य कामे प्रलंबित राहिलेली आहेत. यावर लवकरच उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
सर्वसामान्य शेतकरी माणसाला बहुउपयोगी ठरलेला सातबारा, 8अ चा उतारा सध्या सोसायटीचे कर्ज नवे-जुने करण्यासाठी काहींना नवीन कर्ज घेण्यासाठी तसेच अन्य ठिकाणी उतारा शेतकरी यांना सारखाच गरजेचा असतो. अशातच इंटरनेटच्या जमान्यात ऑनलाईन सातबारा, 8अचा उतारा घेण्यासाठी सायबर कॅफेत तासन्‌तास उतारा शोधण्यात वेळ लागत असल्याने शेतकरी मेटाकुटीला येताना दिसतोच; परंतु त्यांचे कामही रखडलेले असते. त्याचबरोबर तलाठ्यांनाही याचा नाहक त्रास होताना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या बोलण्यातून आले की, पहिले होते तेच ठीक होते नको ते ऑनलाईन सातबारा!
एकीकडे शिरूर तहसीलदार ऑनलाईन सातबाराचे काम पूर्ण झाल्याचे सांगत आहेत, तर दुसरीकडे त्यात अनेक चुका निघत आहेत. त्यामुळे खरेदी विक्री करताना मोठा अडसर येत असून, चुकीचा सातबारा अपलोड कसा झाले यामागील गणित कळू शकत नाही. याला जवाबदार नक्की कोण? तर कायमच सर्वर डाउन कसा होतो? असे अनेक प्रश्न यामधून पुढे येत आहेत. तलाठी यांचा काही हात आहे का, याबाबत नागरिकांना संशय आहे. शासनाने यासाठी मोठी मेहनत घेतली असून, कारभार भ्रष्टाचार मुक्त व्हावा हा यामागचा उद्देश आहे; परंतु यात काहीतरी गौड बंगाल आहे हे नक्की!
त्यामुळे यापुढील काळात ऑनलाईन सातबारा घोळ असाच रहाणार का? असा प्रश्न नागरिक व शेतकरी यांना पडला असून, लवकरात लवकर ही समस्या दूर व्हावी या प्रतिक्षेत सर्वच जण आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)