अकरावी प्रवेश अद्याप सुरुच नाहीत : उपमहापौरांची आयुक्तांकडे पत्राद्वारे मागणी

पुणे – महापालिकेकडून इयत्ता दहावीसाठी भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेंतर्गत 15 हजार रुपये तर इयत्ता बारावीसाठी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेंतर्गत 25 हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीसाठी मागविण्यात आलेल्या अर्जांची मुदत 12 सप्टेंबर रोजी संपत आहे. मात्र, अद्यापही अनेक मुलांनी प्रवेश घेतलेले नसल्याने, या मुलांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागेल, ऑनलाईन प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी महापालिका आयुक्‍तांकडे पत्राद्वारे केली आहे.

महापालिकेकडून या शिष्यवृत्तीचे अर्ज 25 जुलैपासून ऑनलाईन सुरू असून 12 सप्टेंबरपर्यंत पालकांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. मात्र, अद्यापही मेडिकल तसेच इंजिनिअरिंगचे प्रवेश झालेले नाहीत, त्यामुळे अनेक मुलांकडे प्रवेशाची कागदपत्रे नसल्याने त्यांनी अर्ज भरलेले नाहीत. तसेच सण, उत्सवांमुळे शासकीय सुट्ट्याही मोठ्या प्रमाणात असल्याने प्रवेश प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. ही बाब लक्षात घेऊन ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी, मागणी धेंडे यांनी पत्रात केली आहे.

ऑफलाईन प्रक्रिया राबविण्याची मागणी
महापालिका प्रशासनाकडून ऑनलाईन अर्जांची मुदत संपल्यानंतर नागरिकांकडून ऑफलाईन प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आता प्रशासनाकडून ऑफलाईन अर्ज न घेण्याबाबत विचार सुरू आहे. त्यामुळे ज्या पालकांनी अद्याप अर्ज भरलेले नाहीत, त्यांना पुन्हा अर्ज भरण्याची संधी मिळणार नाही, ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने ऑनलाईन मुदत संपल्यानंतर ऑफलाईन अर्जही स्विकारण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी डॉ. धेंडे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)