ऑनलाईन लॉटरी सेंटर बनले जुगाराचे अड्डे

निगडी – पिंपरी-चिंचवड शहरात नव्या आयुक्तालयाच्या निर्मितीनंतर अवैध धंद्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. शहरात सध्या ऑनलाईन लॉटरीच्या दुकानांमध्ये अवैध धंदे चालू असून या प्रकाराकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

पिंपरी-चिंचवड शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, अवैध धंदे कमी व्हावेत, गुन्हेगारी आटोक्‍यात येण्याबरोबरच बेकायदा व्यवसायिकांवर पोलिसांची जरब रहावी या उद्देशाने नव्या आयुक्तालयाची निर्मिती करण्यात आली. मात्र नव्या आयुक्तालयाच्या निर्मितीनंतर उलटाच प्रकार चालू झाला आहे. दिवसेंदिवस शहरात ठिकाणी ठिकाणी सुरू झालेले जुगाराचे अड्डे, अवैध प्रवासी वाहतुकीला मिळत असलेले बळ, बेकायदा धंद्यांमध्ये झालेली वाढ यामुळे आयुक्तालयाच्या उद्देशालाच हरताळ फासल्याचे समोर आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरात ठिकठिकाणी ऑनलाईन लॉटरी सेंटर सध्या सुरू आहेत. यातील बहुतांश लॉटरी सेंटर हे मटक्‍याचे अड्डे बनले आहेत. तर काही ठिकाणी जुगार चालू आहेत. दिवसाढवळ्या चालू असलेल्या या प्रकाराकडे पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात आहे. अत्यंत कमी खर्चा हा व्यवसाय सुरू होत असल्याने सध्या बेकायदा व्यवसाय करणारे अनेकजण या व्यवसायात शिरले आहेत. समोरच्या बाजुला लॉटरी सेंटरचा व्यवसाय थाटला जात असून आतील बाजूस मात्र बेकायदा व्यवसाय चालविला जात आहे.

केवळ एका शॉपऍक्‍टवर व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली जात आहे. ऑनलाईन लॉटरी सुरू करण्यासाठी लागणारा परवाना अत्यंत किचकट आहे. हा परवाना न घेताच भाडेतत्त्वावर मशीन घेवून हा व्यवसाय शहरात सरसकट ठिकाणी चालू आहे. निगडी, भोसरी, पिंपरीतील संत तुकाराम नगर हे या व्यवसायाचे अड्डे बनले आहेत.

बेकायदा व्यवसाय बंद करा
ऑनलाईन लॉटरीला आमचा विरोध नसून या ठिकाणी सुरू असलेला बेकायदा व्यवसाय बंद करा, या मागणीची निवेदने अनेक समाजिक संघटनांनी यापुर्वी दिली आहेत. छावा संघटनेने निवेदन दिल्यानंतर स्मरणपत्रही दिले आहे. मात्र कोणतीच कारवाई अद्याप पोलिसांकडून करण्यात आलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)