ऑनलाईन अर्जासाठी शुल्क घेऊ नये

पुणे, दि. 19 (प्रतिनिधी)- विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या सर्व महाविद्यालयांनी ऑनलाईनद्वारे प्रवेश करणे आवश्‍यक आहे. मात्र महाविद्यालयांनी ऑनलाईन प्रवेशाच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून अतिरिक्‍त शुल्क घेऊ नये, अशा स्पष्ट सूचना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांना दिल्या आहेत.

राज्यातील विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयांनी सर्व अभ्यासक्रमाचे प्रवेश ऑनलाईन करण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने दिले आहेत. त्यानुसार राज्य शासनाने सर्व महाविद्यालयांना ऑनलाईन प्रवेश बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंबंधीची सूचना राज्य शासनाने दि. 22 नोव्हेंबर 2016 रोजी सर्व महाविद्यालयांना पत्राद्वारे दिले होते. त्यात महाविद्यालयाने नव्याने संगणक प्रणाली विकसित करू नये, असेही शासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते.

तथापि, काही महाविद्यालयामार्फत आपल्या स्तरावर स्वतंत्र संकेतस्थळ सुरू करून ऑनलाईन पद्धतीने प्रवेशाची कार्यवाही करण्यात येत आहे. त्यासाठी प्रवेश अर्जाच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून 500 ते 1000 रुपये शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी विद्यापीठाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाने आज परिपत्रक प्रसिद्ध केले. महाविद्यालयांनी ऑनलाईन प्रवेशाच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून अतिरिक्‍त शुल्क घेऊ नये, असे विभागाचे उपकुलसचिव उत्तम चव्हाण यांनी सांगितले.

दरम्यान, शासन स्तरावर “एकसंघ संगणक प्रणाली पद्धती’ उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. त्यामुळे महाविद्यालय स्तरावर नव्याने कोणतेही संगणक प्रणाली विकसित करून, त्यासाठी विद्यार्थ्यांकडून शुल्काची आकारणी करण्यात येऊ नये. तसेच ज्या महाविद्यालयात ऑनलाईन पद्धतीने प्रवेश होत आहेत. अशा महाविद्यालयांनी ऑनलाईन अर्जासाठी शुल्काची आकारणी करू नये, असेही पुणे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)