ऑटोरिक्षा अपघातात चिमुकलीचा मृत्यू; 7 जखमी

दुसरा भीषण अपघात : कोंढव्यातील उतारावर चालकाचा ताबा सुटला
– यापूर्वीच्या अपघातात झाला होता चौघांचा मृत्यू
– शालेय साहित्य आणण्यासाठी जाताना घडली घटना

कोंढवा (वार्ताहर) – येथील तीव्र उतारावरून ऑटो रिक्षाचालकाचा ताबा सुटला आणि रिक्षा वेताळ चौकातील घराच्या कठड्याला धडकली. यामध्ये 12 वर्षीय सानिया आतार हिचा जागीच मृत्यू झाला; तर रिक्षातील 7 जण गंभीर जखमी झाले. हा भीषण अपघात मंगळवारी दुपारी 12:30 च्या दरम्यान कोंढवा खुर्द येथे घडला. यातील जखमी आतार व पठाण कुटुंबिय बाजारपेठेत शालेय साहित्य आण्यासाठी जात होते.

सानिया तौसीफ आतार (12) हीचा जागीच मृत्यू झाला. रिक्षाचालक शेरखान जमीर खान पठाण, तरन्नूम शेरखान पठाण, अस्लिमा पठाण (13), सौलिया पठाण (14) तौफिक पठाण (10), तौसीम तौफीक आतार (30), शोयब तौफिक आतार (12, सर्व रा. शिवनेरीनगर गल्ली नं. 12 कोंढवा खुर्द) हे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर ससून सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे दोन्ही कुटुंबिय शालेय साहित्य व कॅम्प भागातील कन्या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी निघाले होते, अशी माहिती पोलिसांकडून मिळली आहे. शिवनेरीनगरकडून कोंढवा खुर्द गावठाणमध्ये येण्यासाठी एका तीव्र उतारावरून वाहनांना यावे लागते. याच उतारावर गेल्या काही दिवसांपूर्वी ऑटोरिक्षाचा अपघात झाला होता. यामध्ये चौघे ठार झाले होते. मंगळवारी झालेला अपघात आणि यापूर्वीच्या अपघात जवळपास सारखा असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघात घडला, त्यावेळी माजी नगरसेवक भरत चौधरी, सौरभ चौधरी, महेश सावंत, अतुल चौधरी, निलेश महिंद्रकर हे घटनास्थळापासून जवळच होते. जखमींना रिक्षातून काढून त्यांनी त्वरित ऍब्यूलन्समधून ससून सर्वोपचार केंद्रात दाखल केले. त्यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे अन्य जखमींवर त्वरित उपचार मिळाला. पुढील तपास कोंढवा ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गोवेकर करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)