ऑटोपेक्षा विमान प्रवास किफायतशीर

संग्रहित छायाचित्र...

विमान कंपन्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा-प्रभू

मुंबई: पहिल्या जागतिक विमान वाहतूक शिखर परिषदेचे उद्‌घाटन मुंबईत नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी केले. या परिषदेच्या जगभरातील सुमारे 86 देशांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी प्रभू म्हणाले की, विमान सेवा ही खूप जटिल सेवा आहे. त्यामुळे सर्व संबंधितांनी एकत्र येऊन विविध मुद्द्यांवर चर्चा करणे आवश्‍यक आहे. भारताचा हवाई प्रवास पुढे नेण्यासाठी तंत्रज्ञान, संसाधने आणि भागीदारी गरजेची आहे, असे ते म्हणाले. यासाठीच जागतिक विमान वाहतूक शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे वार्षिक किंवा द्वैवार्षिक आयोजन करण्याची भारताची तयारी आहे असे ते म्हणाले.

आज कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बिग डेटासारखे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. हवाई वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी आपण त्याचा पुरेपूर लाभ उठवायला हवा असे आवाहन प्रभू यांनी केले.

आपल्या विमान सेवा पद्धती पृथ्वीला अनुकूल असतील याकडे आपण लक्ष द्यायला हवे. आपले अवकाश कायम प्रदूषणरहित राहायला हवे. ड्रोन धोरण प्रसिद्ध करण्यात आले आहे. भारतात अनेक ड्रोन्सची निर्मिती व्हावी अशी आमची इच्छा आहे. तसेच विमान निर्मितीसाठी देखील लवकरच एक रूपरेषा जारी केली जाईल असे ते म्हणाले. उडान अंतर्गत पाण्यावर उतरणाऱ्या विमानांचा समावेश केला जाईल, यामुळे परवडणाऱ्या दरांना चालना मिळेल. संपूर्ण हवाई वाहतूक क्षेत्राचे व्यावसायिकरण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सुरक्षेशी संबंधित निकषांचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही. राष्ट्रीय लॉजिस्टिक्‍स धोरण लवकरच जाहीर केले जाणार असून देशात अनेक लॉजिस्टिक्‍स केंद्र निर्माण केली जातील असे ते म्हणाले.

यावेळी नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा म्हणाले की भारतात प्रति किलोमीटर दरानुसार ऑटो रिक्षातून प्रवास करण्यापेक्षा विमान प्रवास अधिक किफायतशीर आहे. आम्ही ऑटो रिक्षेकडून एअर रिक्षेकडे जाऊ इच्छितो. गेल्या 4 वर्षात भारतीय विमान वाहतूक क्षेत्रातील वाढ लक्षणीय आहे. किफायतशीर दरात विमान सेवा सुरू केल्यामुळे भारत हवाई क्षेत्राचे जागतिक नेतृत्व करेल असे ते म्हणाले.

नवी मुंबईतील विमानतळ 2020 पर्यंत सुरू होईल. देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात 1 टक्के वाढ करण्याची त्यात क्षमता आहे असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. उडान योजनेमुळे विमान प्रवाशांची संख्या वाढणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)