ऑक्‍टोबर हिटचा चटका; पुणेकरांची लाहीलाही

पुणे – पावसाने मारलेली दडी आणि निरभ्र आकाश यामुळे सुर्याची किरणे थेट जमिनीवर येत असल्याने राज्यात सर्वत्र ऑक्‍टोबर हिट जाणवू लागली आहे. विविध शहरांमध्ये तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे. पुण्यातही कमाल तापमानाचा पारा 34 अंशांपर्यंत पोहोचला आहे.

सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासूनच राज्यात ऑक्‍टोबर हिट सुरू झाली आहे. त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे.नुकताच पाऊस पडून गेला असल्याने हवेत धुलीकण नसतात. त्याचबराबेर आकाश सुद्धा निरभ्र असते. त्यामुळे सुर्याची किरणे थेट जमिनीपर्यंत येत असतात. त्यामुळे जास्त चटके जाणवतात. ही स्थिती आणखी काही दिवस राहणार असल्याची शक्‍यत वर्तवण्यात येत आहे. नोकरीनिमित्त बाहेर पडण्यावाचून गत्यंतर नसल्याने गॉगल, स्कार्फ, रुमाल घेऊनच घराबाहेर पडताना दिसत आहेत. सकाळी गारवारा आणि दुपारी उन्हाचा चटका यामुळे होणारी घामाघूम, अशी काहीशी अवस्था आहे. या उष्म्यापासून सुटका व्हावी, यासाठी प्रत्येक जण गारपाणी, तसेच शीतपेयांचा आधार घेत आहे.

-Ads-

गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानात वाढ झाला आहे. गुरुवारी शहराचे कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस, तर किमान 20.9 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. ऑक्‍टोबर महिन्यातील सरासरी तापमानापेक्षा हे कमाल तापमान अधिक असून साधारण ते 31 अंश सेल्सिअसपर्यंत असते. त्यात यंदा वाढ झाली आहे. आगामी दोन दिवस तापमान असेच चढे राहणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे वातावरणात काही प्रमाणात बदल होऊ शकतो. त्यामुळे विदर्भात काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्‍यता आहे; तर उर्वरित महाराष्ट्रात कोरडे राहणार आहे.

तब्येतीची काळजी घ्या
काहीशा संमिश्र वातावरणामुळे व उकाड्याने हैराण झालेल्या शहरवासियांना व्हायरल आजारांचा सामना करावा लागत आहे. सध्या दुहेरी वातावरणाचा नागरिकांना अनुभव येत असून, याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. त्यामुळे नागरिकांनी तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)