ऑक्‍टोबरमध्येच केडगावात विहिरींनी गाठला तळ

File Photo...

केडगाव- यंदा पाऊस कमी झाल्याने पाण्याची भीषण स्थिती निर्माण होऊ लागली असून, ऑक्‍टोबर महिन्याच्या अखेरीस केडगाव (ता. दौंड) परिसरातील विहिरी तळाला गेल्याचे चित्र दिसून येत आहे.
ग्रामीण भागात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. दौंड तालुक्‍याचे चित्र पाहिल्यास तालुक्‍याच्या पश्‍चिम-उत्तर, तसेच पूर्व भागात मुळा-मुठा आणि भीमा नदीचे पात्र आहे, त्यामुळे नदीकाठी असणाऱ्या शेतकऱ्यांना पाण्याची समस्या लवकर जाणवत नाही; परंतु तालुक्‍याच्या दक्षिण आणि कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या मध्यवर्ती भागात मात्र पाणी समस्या भयंकर जाणवते. मागील चार वर्षापूर्वी अशीच स्थिती होती. सधन भागातसुध्दा टॅंकरच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून द्यावे लागले होते. चालू वर्षीची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. ऑक्‍टोबर महिन्यातच विहिरी तळ गाठण्याच्या स्थितीत आहेत तर हिवाळा चार आणि उन्हाळ्याचे चार महिने कसे जातील, अशी चिंता सध्या शेतकरी बांधवाना लागली आहे. शेती असूनही पाणी नसेल तर तिचा काय उपयोग असा प्रश्न निर्माण होत आहे. पावसाळ्याचे चार महिने कोरडे गेले आता शेतीचे गणित कसे बसवावे, असा विचार शेतकऱ्यांचा सुरू आहे. तालुक्‍याच्या मध्यवर्ती भागातून 22 आणि 23 क्रमांकाच्या वितरिका जातात. सुदैवाने खडकवासला धरण साखळीत पाऊस चांगला झाल्याने उपलब्ध कालव्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे आता पाटबंधारे विभागाचे काम आहे. किमान चार आवर्तने सोडल्यास शेतीचे गणित कसेबसे सुटेल. अन्यथा शेती असूनही उपाशी राहण्याची वेळ शेतकरी वर्गावर आल्यास वावगे वाटू नये.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)