ऐन सणासुदीत पुणेकरांची “पाणी कोंडी’

पालिकेचे जादा पाणी पाटबंधारे विभागाने थांबविले

पूर्व भागाचा पाणी पुरवठा पुन्हा विस्कळीत


सर्व पेठांसह उपनगरांत कमी दाबाने पाणी

पुणे – कालवा समिती बैठकीत पालिकेस 1,150 एमएलडी पाणी मंजूर झाले आहे. तर, दुसरीकडे खडकवासला धरणातून जादा पाणी घेत असल्याचे सांगत पाटबंधारे विभागाने बुधवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास पालिकेस दिले जाणारे जादा पाणी थेट पोलीस बंदोबस्तातच बंद केले. त्यामुळे फक्‍त पर्वती जलकेंद्रांतूनच पाणी पुरवठा करण्यात आला. तर लष्कर जलकेंद्राला पाणीच देता आले नाही. परिणामी, पूर्व भागात खराडी, वडगावशेरी, चंदननगर तसेच हडपसरच्या काही भागाचा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद झाला, तर पर्वती जलकेंद्रासही अपुरा पाणीपुरवठा झाल्याने शहराच्या मध्यवर्ती पेठांसह उपनगरांमध्येही कमी दाबाने पाणी पुरवठा झाला.

-Ads-

खडकवासला कालवा फुटल्याच्या घटनेनंतर महापालिका प्रशासन आणि पाटबंधारे विभागात गेल्या काही दिवसांपासून पाणी वापर आणि थकीत रकमेवरून वाद सुरू आहेत. त्याचे पडसाद कालवा समितीच्या बैठकीत उमटले. मागील वर्षीच्या तुलनेत धरणात कमी पाणी असल्याने पालिकेस दरदिवशी सुमारे 1,150 एमएलडी पाणी निश्‍चित करण्यात आले. तसेच त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, त्यानंतरही गेल्या काही दिवसांपासून पालिकेकडून 1,400 ते 1,500 एमएलडी पाणी उचलले जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे बुधवारी 1,250 एमएलडी पाणी दिल्यानंतर पाणी बंद केल्याचे खडकवासला प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी सांगितले. तर या प्रकराची कोणतीही कल्पना जलसंपदा विभागाने दिली नसल्याचे सांगत महापालिका प्रशासनाकडून या प्रकाराबाबत तातडीने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याच्या प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडूनही पालिकेच्या अधिकाऱ्यांना काहीच प्रतिसाद देण्यात आला नाही. त्याचा परिणाम शहराच्या पाणी पुरवठ्यावर झाल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला.

पोलीस बंदोबस्तात कारवाई
खडकवासला धरणातून 3 बंद जलवाहिन्यांद्वारे महापालिका हे पाणी उचलते. ते पाणी पर्वती जलकेंद्रात आणले जाते. त्यानंतर पर्वती जलकेंद्र भरल्यावर उर्वरित पाणी पर्वती जलकेंद्रांतून लष्कर जलकेंद्रासाठी मुठा कालव्यात सोडले जाते. साधारणतः 4 वाजता हे पाणी सोडले जाते. या बंद जलवाहिनीच्या पंपाचे केंद्र खडकवासला धरणाजवळ असून ते पालिकेकडे आहे. तसेच त्या ठिकाणी पाण्याचे मीटर असून पालिकेने किती पाणी दिवसभरात घेतले, हे त्यावर समजते. त्यावर पाटबंधारे अधिकाऱ्यांनी 2 पंप पोलिसांच्या उपस्थितीत बंद केले.

थकबाकी, दुरुस्ती निधीसाठी दबाव?
कालवा फुटीनंतर पाटबंधारे विभागाकडून कालवा दुरुस्ती तसेच पाण्याच्या थकबाकीची सुमारे 192 कोटींची मागणी पालिकेकडे केली आहे. हा निधी 15 दिवसांत पालिकेने जमा करावा, असे आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी कालवा समिती बैठकीतही दिले. मात्र, पालिकेने अंतिम निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे पुणे शहराची पाणीकोंडी करून ही रक्कम मिळावी, यासाठी दबाव टाकला जात असल्याची प्रशासकीय वर्तुळात चर्चा आहे.

पुणेकरांचे पाणी कुठेही थांबविण्यात आलेले नाही. पुण्यासाठी दररोज 1,150 एमएलडी पाणी द्यावे असा निर्णय आहे. बुधवारी दुपारी हे पाणी 1,250 एमएलडी पेक्षा अधिक झाले. त्यामुळे 2 पंप बंद केले आहेत. हे पाणी शहरात कसे वितरीत करायचे हा सर्वस्वी पालिकेचा निर्णय आहे.
– पांडुरंग शेलार, कार्यकारी अभियंता, खडकवासला प्रकल्प.


शहारत सणामुळे पाण्याची मागणी जादा आहे. तसेच महापालिकेकडून 1150 एमएलडी पाण्याचे शहरासाठी नियोजन करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे काही दिवस जादा पाणी द्यावे, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, त्यास नकार देत 2 पंप बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे लष्कर जलकेंद्राचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. तो सुरळीत केला जाईल.
– व्ही. जी. कुलकर्णी, पाणीपुरवठा विभाग, मनपा.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)