ऐन नवरात्रोत्सवात राज्यावर भारनियमनाचे संकट

तांत्रिक अडचणींचा डोंगर : अडीच हजार मेगावॅट विजेचा तुटवडा

पुणे – कोळशाच्या तुटवड्यामुळे थंडावलेली वीजनिर्मिती, परतीच्या पावसाने दिलेली हुलकावणी आणि वाढलेली विजेची मागणी यामुळे महावितरणला सुमारे अडीच हजार मेगावॅट विजेचा तुटवडा भासत आहे. राज्यात 16 ते 17 हजार मेगावॅट वीजेची उपलब्धता असताना अचानकपणे 19 हजार 500 मेगावॅट विजेची मागणी होत आहे. त्यामुळे महावितरणला अडीच मेगावॅट वीजचा तुटवडा भासत असून राज्यात तात्पुरत्या स्वरुपाचे भारनियमन सुरू करण्यात आले आहे.

महानिर्मितीच्या वीज प्रकल्पांना दररोज 43 दशलक्ष मेट्रीक टन एवढा कोळसा लागतो. मात्र, खाणींमधून कोळशाचे कमी झालेले उत्पन्न तसेच कोळसा वाहतुकीची मर्यादित साधने यांमुळे महानिर्मितीच्या वीजनिर्मिती प्रकल्पांना कोळशाचा तुटवडा भासत आहे. परिणामी, या प्रकल्पांद्वारे होणाऱ्या वीजनिर्मितीवरही मोठा परिणाम झाला आहे. कोयना जलविद्यूत प्रकल्पातून वीजेसाठी राखून ठेवेलेल्या पाण्याच्या वापरावरही मर्यादा आल्याने तेथूनही जास्तीची वीज निर्माण होत नाही. तसेच, खुल्या बाजारातही विक्रीसाठी वीज उपलब्ध नाही. तसेच जी वीज उपलब्ध होते, तिचे दर खूपच अधिक आहेत. त्यामुळे राज्याला मागणीच्या तुलनेत तब्बल अडीच हजार मेगावॅट वीजेची कमतरता भासत आहे.

राज्यात मान्सूनचे आगमन दमदार झाले. मात्र त्यानंतर परतीच्या पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे शेतीपंपासाठी लागणऱ्या वीजेच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. तसेच ऑक्‍टोबर हीट सुरु झाल्यानेही घरगुती वापरासाठीच्या वीजेची मागणी वाढली आहे. एकीकडे वीजेची वाढती मागणी आणि दुसरीकडे विजेची मर्यादित उपलब्धता यामुळे मागणी आणि पुरवठ्याचे गणित जुळत नाही. त्यामुळे राज्यातील वीजेची सर्वात जास्त हानी आणि वसुलीचे कमी प्रमाण असलेल्या भागांमध्ये तात्पुरचे भारनियमन करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महावितरणला केंद्रीय प्रकल्प- 4 हजार 590 मे.वॅ., महानिर्मिती-5 हजार 315 मे.वॅ., गॅस प्रकल्प – 267 मे.वॅ., कोयना- 1 हजार 156 मे.वॅ., अदानी- 2257 मे.वॅ., रतन इंडीया -270 मे.वॅ., जेएसडब्लू -283 मे.वॅ., पवन उर्जा-177 मे.वॅ. आणि सौर उर्जा-528 मे.वॅ. यांच्या माध्यमातून इतकी वीज उपलब्ध होत आहे.

पुणे, पिंपरीत भारनियमन नाही
पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांची वीजबील वसुली चांगली आहे. त्यामुळे या दोन्ही शहरांमध्ये मंगळवारी कोणत्याही प्रकारचे भारनियमन करण्यात आले नाही. तसेच राज्यातील इतर भागांतही भारनियमनाची वेळ येऊ नये, यासाठी महावितरण प्रयत्नशील असून जास्तीत जास्त वीज उपलब्ध करण्याची मोहिम महावितरणने हाती घेतली असल्याची माहिती महावितरणमधील सूत्रांनी दिली.

महावितरणची विजेची मागणी

सुमारे 19 हजार 500 मेगावॅट


राज्यात विजेची उपलब्धता

सुमारे 16 हजार ते 17 हजार मेगावॅट


विजेची तूट 

सुमारे 2 हजार ते अडीच हजार मेगावॅट


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)