ऐन नवरात्रोत्सवात दुर्गादेवी टेकडी अंधारात

पिंपरी – देशभरात सर्वत्र नवरात्रोत्सवाची धुमधडाक्‍यात सुरूवात झाली आहे. आदिशक्तीच्या जागरासाठी विविध मंदिरांचा परिसर आकर्षक रोषणाईने उजळून निघाला असताना निगडीतील दुर्गादेवी टेकडीवरील मंदिराचा परिसर मात्र, सलग दुसऱ्या वर्षी अंधाऱ्या काळोखात बुडाला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका व मंदिर नियोजन समितीच्या या अनास्थेबद्दल नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

हिरव्यागार निसर्ग सौंदर्याने नटलेली दुर्गादेवी टेकडी हे पिंपरी-चिंचवडकरांचे प्रमुख पर्यटन स्थळ, तसेच हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दररोज या ठिकाणी हजारो पर्यटक येत असतात. रोज सकाळ, संध्याकाळ येथे अबालवृद्ध व्यायाम, योगसाधनेसाठी येतात. दुर्गादेवीच्या मंदिरामुळे या ठिकाणी अनेक भाविकांचीही वर्दळ असते. गेले अनेक वर्ष येथे नवरात्रोत्सव उत्साहाने साजरा केला जातो. महापालिकेने या पर्यटन केंद्राचा विकास केला असून त्याची देखभालही महापालिकाच करते. नवरात्रोत्सवात दरवर्षी मंदिर परिसर विद्युत रोषणाईने लखलखलेला असतो. टेकडीच्या प्रवेद्वारापासून मंदिरापर्यंतचा रस्ता उजळल्याने पहाटे आणि रात्री उशिरा येणाऱ्या वृद्ध भाविकांना पायी चालताना त्रासदायक वाटत नसे. परंतु, गेल्या वर्षांपासून महापालिकेच्या अनास्थेमुळे येथे रोषणाई केली जात नसल्याने भाविकांना अंधारात चाचपडत चालावे लागते. गेल्यावर्षी नवरात्रात दोन वृद्ध महिलांना अपघात झाला होता. निदान या वर्षी पालिका प्रशासनाला जाग येईल असे वाटले होते. परंतु, यंदाही पालिकेने भाविकांच्या सुविधा व रोषणाईकडे दुर्लक्ष केले आहे.

-Ads-

दुर्गादेवी टेकडीवर नवरात्रोत्सवानिमित्त दरवर्षी विविध कार्यक्रम घेतले जातात. मात्र, सलग दुसऱ्या वर्षी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. पालिका प्रशासन एरवी नको त्या अनेक कार्यक्रमांवर लाखों रूपये उधळते, त्यावर अनेकदा आक्षेप घेतले जातात. त्याकडे जाणिवपूर्वक कानाडोळा करून वारेमाप उधळपट्टी केली जाते. मात्र, शहरवासीयांच्या श्रद्धेचा अनादर करून नवरात्रोत्सवासारख्या कार्यक्रमांची बोळवण करीत असल्याची टीका भाविकांकडून केली जात आहे. महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना या उत्सवाकडे कधीच दुर्लक्ष झाले नाही. परंतु, गतवर्षी भाजपची सत्ता आल्यापासून दुर्गा टेकडीवर साधी रोषणाईही केली जात नसल्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)