ऐन दुष्काळात हजारो लिटर पाण्याची नासाडी

पाण्याच्या टाक्‍या वाहतायत भरून : वडूजच्या शासकीय कार्यालयातील प्रकार

नितीन राऊत 

वडूज, दि. 6 – पावसाने हुलकावणी दिल्यामुळे तालुक्‍याला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यातच खटाव तालुका दुष्काळी यादीतून वगळल्याने तालुक्‍यातील काही भागात अक्षरशः पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अशातच येथील शासकीय कार्यालयातील पाण्याच्या टाक्‍या भरून हजारो लिटर पाणी वाया जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे .

विशेषतः खटाव तालुक्‍यातील पाच गावांना पंचायत समितीच्या माध्यमातून टॅंकरने पाणी पुरवठा केला जातोय. तालुक्‍याच्या पूर्व भागात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. असे असतानाही तालुक्‍यातील शासकीय कार्यलयातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्‍या पूर्ण क्षमतेने भरून वाहत असून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. पाणी वाचवा जीवन वाचवा असा संदेश देणाऱ्या शासनाच्या कार्यालयातूनच अशा प्रकारे पाण्याचा दुरूपयोग होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. पंचायत समितीच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीतूनही मोठ्या प्रमाणात पाणी जमिनीवर सांडून वाया जात आहे. पाण्याच्या टाकीत पडणाऱ्या पाईपलाईनचे कॉक हे नेहमीच चालू स्थितीत असतात. पाणी किती वेळ टाकीत पडले जाते व टाकी भरून किती वेळ जमिनीवर पडली जाते, याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. समितीच्या इतर भागात असलेल्या पाण्याच्या काही टाक्‍या गळक्‍या असून पाण्याची टाकी भरण्याअगोदरच मोकळी होत आहे.

नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरात पाणी पुरवठा होत असलेल्या पाण्याच्या टाकीतूनही हजारो लिटर पाणी वाया जात आहे. पाणीसाठा कमी असल्याने शहरात दोन ते तीन दिवसाकाठी पाणी पुरवठा केला जातोय. मात्र, प्रत्यक्षात ज्या टाकीत पाणी साठवले जात आहे, त्याच टाकीतून हजारो लिटर पाणी सांडले जात आहे. तसेच या परिसरात सांडलेल्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात दलदल निर्माण झाली आहे. यामुळे नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना व पदाधिकाऱ्यांना कदाचित दुष्काळाची दाहकता दिसून येत नसल्याचे बोलले जात आहे.

खटाव तालुक्‍यात पाण्याची भीषणता असताना दुष्काळी यादीतून खटाव तालुका वगळल्याने आम्ही अन्नत्याग केला. तसेच या जिल्ह्याच्या कार्यक्षम जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी या मागणीची दखल घेऊन तात्काळ संबंधित विभागाना तात्काळ आदेश दिले. हे करत असताना तालुक्‍यातील मुख्य शासकीय कार्यालये यांच्याकडूनच पाण्याची नासाडी केली जात आहे, ही बाब संतापजनक आहे.
विजयदादा शिंदे
सामाजिक कार्यकर्ते वडूज

 नगरपंचायतीच्या माध्यमातून ज्या कार्यालयाकडे पाणी पुरवठा केला जात आहे. त्या कार्यलयाच्या संबंधित विभागाने पाण्याच्या कनेक्‍शनला नळ बसवून घ्यावेत. यामुळे पाण्याची नासाडी होणार नाही याची दक्षता घ्यावी.

– शहाजी राजेगोडसे, नगरसेवक


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)