ऐन दिवाळीत होमगार्डस्‌वर “शिमग्या’ची वेळ

जवान पगारापासून वंचित : जुलैपासून रखडले मानधन

पुणे – दिवाळीची धामधूम सुरू असताना होमगार्ड जवानांना जुलैचे मानधन देण्यास राज्य गृह विभागाला अपयश आले आहे. वेतनाबाबतचा प्रस्ताव दोन महिन्यांपूर्वी पाठवूनही आणि पाठपुरावा करुनही त्याची दखल घेण्याचे औदार्यही प्रशासनाने दाखवले नाही. त्यामुळे ऐन दिवाळीच्या सणात राज्यभरातील तब्बल 40 हजार होमगार्ड जवानांवर “शिमगा’ करण्याची वेळ आली आहे.

अनेक महत्त्वाच्या प्रसंगी होमगार्ड जवान बंदोबस्ताच्या वेळी तेरा ते पंधरा तास पहारा देत आहेत. पण, त्यांना आहार भत्त्यासह केवळ चारशे रुपयांचे मानधन मिळते. तरीही या जवानांकडून अथवा त्यांच्या संघटनांकडून आतापर्यंत कधीही आंदोलनाचे अथवा संपाचे हत्यार उपसण्यात आले नाही. मात्र, बंदोबस्त करुनही या जवानांना चार-चार महिने मानधनच मिळत नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. राज्यभरातील होमगार्डच्या चाळीस हजार जवानांनी जुलैपासून गणेशोत्सव, दसरा, घटस्थापना आणि अन्य कारणांसाठी बंदोबस्त केला होता. त्याबाबतचा प्रस्ताव आणि मानधनाबाबतचा आराखडा त्या-त्या कार्यालयांनी गृह विभाग तसेच होमगार्डच्या मुख्य कार्यालयांना सादरही केला होता. त्यानुसार दिवाळीआधी मानधन संबंधित होमगार्डच्या बॅंक खात्यावर जमा करण्यात येईल, असे राज्याच्या गृह विभागाने कळविले होते.

त्यानुसार दिवाळीच्या आधीपासूनच होमगार्डच्या या जवानांनी मुख्य कार्यालयाय हेलपाटे मारण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी मानधन लवकरच जमा होईल असा शब्द त्यांना देण्यात आला होता. मात्र, दिवाळीचा सण सुरू होउन तीन दिवस उलटूनही या जवानांच्या बॅंक खात्यावर त्यांचे मानधन अजून जमा झालेले नाही. परिणामी हे जवान त्रस्त झाले असून दिवाळीचा सण कसा साजरा करायचा, असा प्रश्‍न त्यांना पडला आहे.

जवानांचे वेतन जमा करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्य कार्यालय आणि गृह विभागाला देण्यात आला होता. त्यानुसार हे मानधन मिळणे गरजेचे होते, त्यासाठी यापुढील कालावधीत पाठपुरावा करण्यात येणार आहे.
-उत्तमराव साळवी, शहर समादेशक, होमगार्ड.

इतर सुविधा कधी मिळणार?
कंत्राटी अथवा मानसेवी कामगार असले, तरी त्यांना नियमानुसार भविष्य निर्वाह निधी, वैद्यकीय सुविधा, दिवाळीचा बोनस आणि अन्य सुविधा मिळाल्याच पाहिजेत असे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतचे नियम राज्य शासनानेच तयार केले आहेत, या नियमांचे उल्लघंन करणाऱ्या कंपन्या अथवा अन्य आस्थापनांविरोधात कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र, या नियमांना खुद्द शासनकर्तेच केराची टोपली दाखवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. होमगार्डच्या जवानांना बोनसच काय पण यातील कोणतेही लाभ मिळत नाहीत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)