ऐन दिवाळीच्या तोंडावर संसार “खाक’

पिंपरी – चिंचवड मधील दळवीनगर झोपडपट्टीमध्ये गुरुवारी (दि. 25) पहाटे अचानक आग लागली. या आगीमध्ये दोघांचा होरपळून मृत्यू झाला. तर सहा संसार पूर्णतः बेचिराख झाले. दिवाळी सणाच्या तोंडावर ही कुटुंबे रस्त्यावर आल्याने परिसरात हळहळ व्यक्‍त होत आहे.

एका घरात सिलेंडरचा स्फोट झाल्याने पसरली आणि आगीने रौद्र रूप धारण केले. या आगीमध्ये संजय क्षीरसागर, म. सा. जाधव, शंकर पांचार, हरी मनोहर, रवी वाघमारे यांची घरे जळून गेली आहेत. तर संजय क्षीरसागर व प्रदीप मोटे यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. जळालेल्या सहा घरांमध्ये एकूण 27 लोक राहत होते.
संजय क्षीरसागर यांच्या घरात यल्लम्मा देवीचे मंदिर आहे. ते यल्लम्मा देवीचे निःस्सीम भक्त होते. देवीची पूजा, सेवा करण्यात त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य घालवले. कोजागिरी झाल्याने त्यांनी देवीचा संपूर्ण साज काढून ठेवला होता. तो देखील आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला. मंदिर देखील पूर्ण बेचिराख झाले, असे त्यांचे शेजारी रवी वाघमारे यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रवी वाघमारे हे चिंचवड मधील एका खासगी कंपनीत काम करतात. घटना घडली त्यावेळी ते रात्र पाळीत काम करत होते. त्यांच्या घरात एकूण आठ लोक राहतात. त्यांच्या घराच्या दोन खोल्या असून एका खोलीत पत्नी आणि मुले झोपतात तर एका खोलीत वडील झोपतात. रात्री वडील झोपलेल्या खोलीला आग लागली. आगीच्या ज्वाला बघून वडील कसेबसे बाहेर पडले. त्यानंतर पत्नीने मला फोन केला. घटना ऐकल्यावर सुरुवातीला धक्का बसला. पण बळ एकवटून पत्नीला विचारले बाबा, मुले कशी आहेत. त्यांची खुशाली कळल्यानंतर जीवात जीव आल्याचे त्यांनी सांगितले.

असाच प्रसंग मंगल मारुती सोनवणे यांच्याबाबतीत घडला. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. हाकेच्या अंतरावर दळवीनगर झोपडपट्टीत त्यांच्या आई-वडिलांचे घर आहे. मुलांचा एकत्र अभ्यास होत नाही म्हणून दोन मुलींना आजीच्या घरी अभ्यासासाठी पाठवले होते. अभ्यास झाल्यानंतर मुली आजीसोबत झोपल्या. रात्री अचानक आग लागली आणि प्रचंड गोंधळ झाला. घरातून बाहेर येऊन बघितले तर आईचे घर पूर्ण जळून गेले होते. मनात शंकेची पाल चुकचुकली, हातापायातील अवसान गळून गेले. अंगाचा थरकाप सुटला. पण अचानक मोठ्याने आई म्हणत दोन्ही मुलींनी मिठी मारली. मुलींचा आवाज आणि स्पर्श होताच डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले. मुलींना कुरवाळत नजर आईलाच शोधत होती. काही वेळ जाताच आई दिसली, असे डोळ्यात पाणी दाटलेल्या मंगल मारुती सोनवणे सांगत होत्या.

झोपडपट्टीमध्ये अगदी सर्वसामान्य लोक राहतात. तांब्या पितळेची भांडी त्यांच्याकडे नसतात. त्यांचा बहुतांश संसार प्लास्टिकच्या भांड्यावर चालतो. सर्व घरांमध्ये तांदूळ, बाजरी, गहू, ज्वारी, पीठ अन्य किराणा सामान प्लास्टिकच्या डब्यात भरून ठेवले होते. आगीच्या तांडवात सर्व भांडी-डबे जळाल्याने किराणा सामान भाजून अस्ताव्यस्त पडले आहे. वाचलेल्या लोकांच्या अंगावरील कपडे तेवढे सुरक्षित असून सगळा संसार बेचिराख झाला आहे.

प्लास्टिक नव्हे सणाचा आनंद वितळला!
अनंत वाघमारे यांचे या आगीत घर जळून खाक झाले आहे. ते पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कचऱ्याच्या गाडीवर काम करतात. काम करत असताना लहान सहान प्लास्टिक ते घरात जमा करून ठेवतात. वर्षभर जमा झालेले प्लास्टिक प्रत्येक दिवाळीच्या अगोदर विकून त्यात सणाची खरेदी ते गेली अनेक वर्षे करत आहेत. त्याच्या विक्रीतून येणाऱ्या पैशातून नातवांना कपडे आणि फटाके घेण्याचा त्यांचा रिवाज मागील काही वर्षांपासून सुरु आहे. या वर्षीचे देखील नियोजन झाले होते. दोन-चार दिवसांनी वर्षभर जमा केलेले प्लास्टिक ते विकणार होतो. मात्र, अचानक लागलेल्या आगीत प्लास्टिक पुर्णपणे वितळून गेले. या घटनेत प्लास्टिक नव्हे तर सणाचा आनंद वितळून गेल्याचे दुःख रात्रीपासून बोचत असल्याचे सांगताना अनंत वाघमारे यांना गहिवरुन आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)