ऐन गणेशोत्सव वीजेचा लपंडाव

गणेश मंडळाचे कार्यकर्ते हैराण : देखावे खुले करण्यास अडचण

पिंपरी – गणरायाच्या आगमनाने सर्वत्र भक्तीमय वातावरण आहे. मात्र, वरिष्ठ पातळीवरुन सूचना असताना देखील शहराच्या विविध भागांमध्ये वीजेच लपंडाव सुरु आहे. यामुळे देखावे पूर्ण करताना अडचण निर्माण होत असल्याने गणेश मंडळाचे कार्यकर्ते हैराण झाले आहेत.

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या काळात राज्यातील पुणे, मुंबई, पिंपरी-चिंचवडसह महत्त्वाच्या शहरांमध्ये वीजेची मागणी वाढते. सध्या गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून, देखावे खुले करण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग सुरु आहे. मात्र, दोन दिवसांपासून पुन्हा हजेरी लावलेल्या पावसामुळे वीज पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. यामुळे देखावे खुले करण्यासाठी अडचणी येत असल्याची गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांची तक्रार आहे.

विद्युत रोषणाई व सजावटीचे इतर देखावे तयार करताना अनेक गोष्टी तपासून घ्याव्या लागतात. यामध्ये बल्ब, व विजेची उपकरणे यांची तपासणी करावी लागते. याशिवाय मूर्त्यांच्या हालचालीच्या देखाव्यांमध्ये मूर्तीची हालचाल योग्यप्रकारे होत आहे की नाही, हे पहावे लागते. दरम्यान, वीजपुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने या बाबी तपासून घेण्यास अडचण निर्माण होत आहे. यामुळे कामाचा खोळंबा होत असल्याने खर्चात वाढ होत आहे. कमी खर्चाचे बजेट असलेल्या गणेश मंडळांना वाढीव खर्च परवडणारा नाही. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी गणेश मंडळांकडून होत आहे.

संत तुकारामनगर, महेशनगर भागामध्ये गणेशोत्सवाच्या आधीपासूनच वीजेचा खेळखंडोबा सुरु आहे. मंडळाच्या गणेश मंडपाची सजावट करताना अखंडीत वीज पुरवठ्यामुळे अडचणींचा सामना करावा लागला. मंडपाच्या विद्युत रोषणाईच्या सजावटीसाठी बोलवलेल्या कामगारांना वीज गेल्यानंतर अक्षरशः बसवून ठेवावे लागले. सजावटीच्या कामाला नाहक उशिर झाला. रात्रभर जागून सजावट पूर्ण करावी लागली. गणेशोत्सव सुरु झाल्यानंतर त्यात बदल होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने परिसरातील सर्वच मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
विशाल माने, अध्यक्ष, सन्मित्र मित्र मंडळ, महेशनगर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)