ऐतिहासिक विजयासाठी टीम इंडिया सज्ज

परदेशातील कसोटी मालिकेत पहिल्यांदाच “व्हाईट वॉश’ची संधी
कॅंडी – दुय्यम दर्जाच्या श्रीलंकेविरुद्ध पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांत एकतर्फी विजयाची नोंद करणारा भारतीय संघ उद्या (शनिवार) सुरू होत असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातही विजय मिळवून ऐतिहासिक कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. ही कसोटी जिंकता आल्यास परदेशातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिल्यांदाच “व्हाईट वॉश’ साधण्याचा बहुमान त्यांना मिळविता येणार आहे. त्याच वेळी मायदेशात तीनही कसोटी सामने गमावण्याची नामुष्की टाळण्याचे आव्हान श्रीलंका संघासमोर आहे.

प्रमुख खेळाडू एकामागून एक निवृत्त झाल्यामुळे श्रीलंकेचा संघ सध्या संक्रमणावस्थेतून जात आहे. नव्या खेळाडूंमध्ये गुणवत्ता असली, तरी त्यांना अद्याप पुरेसा अनुभव नाही. त्याचा फायदा घेत भारतीय संघाने पहिला कसोटी सामना 304 धावांनी, तर दुसरा कसोटी सामना एक डाव 53 धावांनी जिंकत मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडीही घेतली. आता किमान तिसरा कसोटी सामना जिंकून प्रतिष्ठा वाचविण्याचा प्रयत्न श्रीलंका संघ करणार हे निश्‍चित आहे.
त्यातही मालिका अगोदरच जिंकल्यामुळे भारतीय संघाने प्रमुख खेळाडूंना वगळून नवोदितांना संधी देण्याचे धोरण अवलंबले असल्याने श्रीलंकेच्या आशा उंचावल्या आहेत. परंतु त्यांच्या प्रयत्नांमध्ये हवामानाचाच अडथळा होण्याची शक्‍यता आहे. भारतीय संघाचे आजचे सराव सत्र पावसामुळे रद्द करावे लागले. उद्यापासून पावसाचा सातत्याने व्यत्यय राहणार असल्याचे भाकित हवामान खात्याने वर्तविले असल्याने दोन्ही संघांनी अंतिम संघनिवड जाहीर केलेली नाही.

भारताने याआधी इंग्लंडवर 1993 मध्ये आणि श्रीलंकेवर 1994मध्ये 3-0 असा विजय मिळविला होता. तसेच श्रीलंकेला 2015मध्ये पहिला सामना गमावल्यानंतर 2-1 असे हरविले होते. परंतु गेल्या 85 वर्षांचया कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाला तीन सामन्यांची कसोटी मालिका कधीही 3-0 अशी जिंकता आलेली नाही. ही कमतरता विराट कोहलीचा संघ भरून काढणार की नाही इतकीच उत्सुकता या कसोटीतून आहे.

भुवनेश्‍वर, मुकुंदला संधी?
पल्लेकेले स्टेडियमवरील हिरव्यागार खेळपट्टीसाठी श्रीलंकेने दुष्मंता चमीरा आणि लाहिरू गमगे या वेगवान गोलंदाजांचा संघात समावेश केला आहे. त्याच धर्तीवर तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून विराट कोहलीही भुवनेश्‍वरचा समावेश करण्याची शक्‍यता आहे. तसेच कुलदीप यादवला संधी देण्यासाठी हार्दिक पांड्याला बाहेर बसावे लागेल. पहिल्या कसोटीतील दुसऱ्या डावात शानदार खेळी केल्यानंतरही अभिनव मुकुंदला दुसऱ्या कसोटीत बाहेर बसावे लागले होते. त्याला या वेळी पुन्हा संधी मिळण्याची शक्‍यता आहे. परंतु रोहित शर्माला मात्र प्रतीक्षाच करावी लागेल असे दिसते. कोहलीने भारतीय संघाचे 28 कसोटी सामन्यांत नेतृत्व केले आहे आणि त्याने तोच संघी पुन्हा कधीही खेळविलेला नाही. उद्याही त्याचीच पुनरावृत्ती होणार आहे.

प्रतिस्पर्धी संघ- विराट कोहली (कर्णधार), अजिंक्‍य रहाणे (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, चेतेश्‍वर पुजारा, रोहित शर्मा, रविचंद्रन अश्‍विन, अक्षर पटेल, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), ईशांत शर्मा, उमेश यादव, हार्दिक पांड्या, भुवनेश्‍वर कुमार, महंमद शमी, कुलदीप यादव व अभिनव मुकुंद.

श्रीलंका- दिनेश चंडीमल (कर्णधार), उपुल थरंगा, दिमुथ करुणारत्ने, कुशल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, लाहिरू थिरिमन्ने, धनंजया डीसिल्व्हा, निरोशन डिकवेला (यष्टीरक्षक), दिलरुवान परेरा, लाहिरू कुमारा, विश्‍वा फर्नांडो, दुष्मंता चमीरा, लाहिरू गमगे, लक्षम संदाकन व मलिंदा पुष्पकुमारा.
सामन्याचे ठिकाण- पल्लेकेले स्टेडियम, कॅंडी. सामन्याची वेळ- रोज सकाळी 10 पासून.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)