ऐतिहासिक कामगिरी करणारी भारताची सुवर्णकन्या राही सरनोबत…

समकालीन स्थितीमध्ये राष्ट्रभक्तीचे अवडंबर माजविले जात असताना, आपण राष्ट्रासाठी भरीव असे योगदान देत आहोत, याचे भान जपत कार्य करणारी असंख्य व्यक्तिमत्वे आपल्या देशात आहेत. कधी ते प्रकाशझोतात येतात तरी कधी नाही पण तरीही त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये योगदान देणे सातत्यपूर्ण चालू ठेवले आहे. यातीलच एक नाव म्हणजे राही सरनोबत.

राही सरनोबत हे नाव जितके भारदस्त आहे, तितकीच तिची कामगिरी सर्व देशवासीयांना प्रेरणादायी अशीच आहे. राही हिच्या नेमबाजीतील प्रवासाबद्दल पाहिले असता, आपल्याला असंख्य गोष्टी शिकता येतात. तिला असे कधी वाटले नव्हते की, आपण नेमबाज होऊ..! मात्र, काळ बदलत गेला आणि आज राही हे नांव आंतरराष्ट्रीय नेमबाजीमध्ये एक यशस्वी नेमबाज म्हणून घेतले जात आहे.

राहीचा नेमबाजीचा प्रवास अतिशय वेगळा आणि प्रेरणादायी असाच आहे. शाळेत शिकत असताना तिला एनसीसीच्या माध्यमातून नेमबाजी या क्रीडा प्रकाराबद्दल माहिती मिळाली. पुढे 2006 मध्ये दहावीच्या सुट्ट्यांमध्ये आहे वेळ तर चला नेमबाजी करू म्हणून ती शुटींग रेंजवरती गेली आणि तेच तिच्या आयुष्याचे ध्येय बनले. तिला नेमबाजीमध्ये करियर वगैरे करायचे काहीही करायचे नव्हते. मात्र, तिला हळूहळू या क्षेत्राची आवड निर्माण होत गेली आणि हेच तिचे आयुष्य बनून गेले.

खूप कमी वयामध्ये, अधिक अनुभव नसतानाही तिला अपेक्षित यश मिळत गेले. खूप मेहनत घेत तिने मिळेल त्या संधीचे सोने बनविले. तेजस्विनी सावंत आणि अंजली भागवत या खेळाडूंना आदर्श ठेवून राहीने आपल्या करियरची सुरूवात केली होती. त्यांचे तिला मार्गदर्शनही लाभले आहे.

राहीला जकार्ता येथे सध्या सुरू असलेल्या आशियायी क्रीडा स्पर्धेमध्ये 25 मी. पिस्तूल प्रकारामध्ये सुवर्णपदक मिळाले आहे. हे पदक मिळविणारी ती पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे.

राहीने आत्तापर्यंत असंख्य विक्रम आपल्या नावावर केलेले आहेत. तिचा यशाचा आलेख सातत्यपूर्ण चढता राहिलेला आहे. राष्ट्रकुल, आशियाई, विश्वचषक अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिने सुवर्णपदक मिळविलेले आहे. यासाठी ती गेली बारा वर्ष झाली सातत्यपूर्ण मेहनत घेत आहे. या एका तपाच्या प्रवासात तिच्या आयुष्यात असंख्य चढ-उतार आले मात्र, तिने कधी नकारात्मकतेला आपल्या जवळ येऊ दिले नाही. कायम सकारात्मक राहत, आपल्या खेळाशी प्रामाणिक राहत ती सातत्यपूर्ण आपला दर्जा वाढवीत आहे. नेमबाजी या खेळासाठी लागणारी एकाग्रता, सराव, मेहनत, तंत्र, स्व:नियंत्रण, ध्यान, संयम आणि शिस्त या गुणांच्या मदतीने ती आज अपेक्षित उंचीवरून मार्गक्रमण करीत आहे.

राहीच्या या यशस्वी प्रवासामध्ये तिच्या आई-वडिलांची महत्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे. त्यांनी तिला तिच्या आवडीचे करियर निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आणि त्यासाठी त्यांनी तिला पाठिंबाही दिला. तिला नेमबाजीसाठी असंख्य लोकांची मदत झालेली आहे. त्यामध्ये ती तिच्या प्रशिक्षकाचे विशेष आभार मानते.

हाताच्या दुखापतीमुळे काही काळ तिला नेमबाजीपासून दूर राहावे लागले होते. पुनर्वसनाच्या दरम्यान, ती सातत्यपूर्ण स्वत:वर मेहनत घेत अपेक्षित उंचीसाठी प्रयत्नशील होती. एक दिवस नक्कीच राही भारतासाठी ‘ऑलिम्पिक सुवर्ण पदक’ जिंकेल या विश्वासह तिला पुढील यशस्वी प्रवासासाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा.

आंतराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक मिळाल्यानंतर त्या विशिष्ट देशाचा ध्वज फडकाविला जातो आणि त्या देशाचे राष्ट्रगीत सन्मानाने वाजविले जाते. आपल्या कामगिरीमुळे राष्ट्राचा गौरव होणे यापेक्षा दुसरा आनंद तो काय असेल. हा क्षण आयुष्यभर स्मरणात राहील असाच असतो. आत्तापर्यंत राही आणि इतर भारतीय खेळाडूंची आशियाई स्पर्धेतील कामगिरी निश्चितपणे कौतुकास पात्र आहे.

प्रत्येक खेळाडूचे ऑलिम्पिकमध्ये खेळून देशासाठी सुवर्ण कामगिरी करण्याचे स्वप्न असते. भारताच्या ऑलिम्पिक आणि इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील यश पाहिले की, वाटते आपण इतके कसे मागे आहोत. १३० कोटी लोकसंख्या आणि पदके मात्र बोटावर मोजण्याइतकी…! चीन, अमेरिका आणि इंग्लंड या देशांची कामगिरी आपल्यापेक्षा खूप चांगली आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार केला असता केवळ पदक जिंकल्यानंतर मिळणारी रक्कम एकीकडे आणि आपल्या खेळाडूंना मिळणाऱ्या तुटपुंज्या सुविधा दुसरीकडे..! आपल्याकडे खेळ या विषयाला प्राधान्यक्रमाने पाहिलेच जात नाही. आणि विशेष म्हणजे खेळ या प्रकाराला पर्यायी पर्याय म्हणून पाहिले जाते. ही मानसिकता बदलने खूप आवश्यक आहे.

सामान्य घरात झालेला जन्म आणि कोल्हापूर सारख्या कुस्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी नेमबाजी हा क्रीडा प्रकार निवडून आज भारताचे प्रतिनिधित्व करणारी राही सर्वांसाठी एक आदर्श खेळाडू आहे.

 

– श्रीकांत येरूळे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
24 :thumbsup:
8 :heart:
1 :joy:
1 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)