एस.टी.च्या “पार्किंग’चा असाही फायदा!

पिंपरी – शिवाजीनगर, स्वारगेट आगारात पार्किंगसाठी पुरेशी जागा नसल्याने एस. टी.च्या शिवशाही बसेस पिंपरी-चिंचवडमधील वल्लभनगर आगारात मुक्कामासाठी पाठवल्या जात आहे. ही बाब पिंपरी-चिंचवड शहरातील प्रवाशांच्या पथ्यावर पडली असून आता बस पकडण्यासाठी पुणे गाठण्याचे त्यांचे दिवस संपले आहेत.

पुण्यातून पश्‍चिम महाराष्ट्रात प्रवास करायचा असल्यास स्वारगेट बस स्थानकावरुन बस मिळतात. तर मराठवाडा, विदर्भ, व उत्तर महाराष्ट्रासाठी शिवाजीनगर आगारातून बस मिळतात. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांना बस पकडण्यासाठी पुणे गाठावे लागायचे. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे शहरात सर्वत्रच पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे. मात्र, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एस. टी.) वल्लभनगर आगारात बस उभ्या करण्यासाठी प्रशस्त जागा उपलब्ध आहे.

स्वारगेट आणि शिवाजीनगर आगारात महाराष्ट्राच्या विविध भागातून येणाऱ्या बसेसची संख्या मोठी असल्याने तेथे पार्किंगला जागा मिळत नाही. परिणामी दोन्ही आगारातील सुमारे 180 बस वल्लभनगर आगारात मुक्कामी येतात. यामध्ये शिवशाही बसेसची संख्या मोठ्‌या प्रमाणावर आहे. वल्लभनगर आगाराच्या मालकीच्या एकूण 55 गाड्या असून त्यात 9 शिवशाही गाड्या आहेत. वल्लभनगर आगारातून खास कोकण विभागासाठी गाड्या जातात. मात्र, याठिकाणी शिवाजीनगर व स्वारगेट आगाराच्या गाड्या मुक्कामी येत असल्याने प्रवाशांना येथूनच बस उपलब्ध होत आहे.

शिवाजीनगर आणि स्वारगेट आगारात “पार्किंग’साठी जागा उपलब्ध नसल्याने सुमारे 40 ते 50 “शिवशाही’ गाड्या पिंपरी-चिंचवडच्या वल्लभनगर आगारात रात्री किंवा दिवसा मुक्कामी असतात. यामुळे वल्लभनगर आगार “शिवशाही’ ने गजबजलेले असते. वल्लभनगर आगारातून पिंपरी-चिंचवडकरांना महाराष्ट्रभरात कोठेही प्रवास करायचा असल्यास जवळपास सर्व ठिकाणच्या गाड्या मिळतात. त्यामुळे उशिराने का होईना पिंपरी-चिंचवडकर प्रवाशांना “अच्छे दिन’ आले आहेत.

शिवाजीनगर व स्वारगेट या दोन बस स्थानकावरील “पार्किंग’चा ताण कमी करण्यासाठी दोन्ही स्थानकावरील “शिवशाही’ व काही साध्या गाड्या वल्लभनगर आगारात मुक्कामी असतात. याचा फायदा पिंपरी-चिंचवडच्या प्रवाशांना निश्‍चित होत आहे.
– संजय भोसले, वल्लभनगर आगार प्रमुख.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)