एससी-एसटी राज्य फोरमची स्थापना

मुंबई – राज्यातील अनुसूचित जाती-जमातीच्या न्याय हक्कासाठी एससी-एसटी राज्य फोरमची स्थापना करण्याचा निर्णय विधीमंडळाच्या आजी-माजी सदस्यांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना दिली.

सदर बैठकीत एससी-एसटी राज्य फोरमच्या अध्यक्षपदी राजकुमार बडोले यांची, तर कार्याध्यक्षपदी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांची निवड करण्यात आली. राज्य फोरमची धर्मदाय कार्यालयात नोंदणी करण्यासाठी तसेच सदर फोरमची उपविधी तयार करण्यासाठी घटना समितीची निवड करण्यात आल्याचेही बडोले यांनी सांगितले.
राज्याच्या अर्थसंकल्पात अनुसूचित जाती-जमातींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात तरतूद करणे, तसेच सदरचा निधी इतर विभागात वळवण्यास आणि व्यपगत करण्यास मनाई करण्याचे निर्देश चौदाव्या वित्त आयोगाने दिले. मात्र त्यावर गांभीर्याने अंमल केला जात नसल्याची खंत सर्वच सदस्यांनी व्यक्त केल्याचे बडोलेंनी यावेळी सांगितले.

राज्यात नापिकी आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून 10 लाखापर्यंत कर्ज घेतलेल्यांचे व्याज माफ करण्याच्या निर्णयाचे स्वागत करून याच धर्तीवर सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाच्या आर्थिक विकास महामंडळांकडून 10 लाखापर्यंत कर्ज घेतलेल्यांनाही याच न्यायाने व्याजमाफी देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. यासाठी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टमंडळाने भेट घ्यावी, असे बैठकीत ठरल्याचे बडोले म्हणाले.

अनुसूचित जाती-जमाती व इतर मागासवर्गीय पदोन्नती आरक्षणाचा कायदा 2004 चे अन्वये दिलेल्या पदोन्नतींना आरक्षण रद्द करण्याचा उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान द्यावे, तसेच एसपीएल दाखल करावे, त्यासाठी कायदे तज्ज्ञाची सल्लागार म्हणून नेमणूक करावी, असेही ठरविण्यात आल्याचे बडोले यांनी सांगितले.

एससी-एसटी राज्य फोरमची नोंदणी तातडीने करण्याचे, तसेच 12 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय अधिवेशन मुंबईत आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. सदर राष्ट्रीय अधिवेशनात देशभरातील आजी-माजी संसद आणि विधिमंडळाचे सदस्य उपस्थित राहणार असल्याचेही बडोले यांनी सांगितले. केंद्रात आणि देशभरात एससी-एसटी राज्य फोरम महत्वाची भूमिका पार पाडेल, असा विश्वासही बडोलेंनी यावेळी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)