“एसपीव्ही’ला महासभेची मान्यता

“स्मार्ट सिटी’ अभियान : अध्यक्षपदी नितीन करीर
पिंपरी, (प्रतिनिधी) – “स्मार्ट सिटी’ अभियान पिंपरी-चिंचवड शहरात राबविण्यास विशेष उद्देश वहन (एसपीव्ही) स्थापना प्रस्तावाला आज (शुक्रवारी) झालेल्या सर्वसाधारण सभेने मान्यता दिली. तसेच, अभियानच्या वित्तीय आकृती बंधानुसार पालिकेचा स्वःहिस्सा उभा करण्याकरिताही मान्यता देण्यात आली. या विशेष उद्देश वहनच्या अध्यक्षपदी नगरविकासचे प्रधान सचिव नितीन करीर हे असणार आहेत.

महासभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. महापालिका महासभेत नगरसेवक प्रमोद कुटे यांनी विशेष उद्देश वहनची माहिती सभागृहास द्यावी, तर “स्मार्ट सिटी’ अभियानची निवड कशी झाली, त्यांचे निकष कोणते आहेत. कोणत्या आधारावर शहराचा समावेश झाला, अशी मागणी विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी केली. यावर नगरसेवक शत्रुघ्न काटे म्हणाले की, “स्मार्ट सिटी’ योजनेसाठी पिंपळे गुरव व पिंपळे सौदागर भागातून नागरिकांच्या घेतलेल्या सर्व्हेतून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या भागाची निवड झाली आहे.

यावेळी माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण म्हणाले की, केंद्राने शहरातील नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारण्यासाठी स्वच्छ, शाश्वत, पर्यावरणपूरक शहरे बनविण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता “स्मार्ट सिटी’ अभियान राबविण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. “स्मार्ट सिटी’ योजनेत सहभागी होण्यास महापालिकेने ठरावही केला. “स्मार्ट सिटी’ अभियानात राज्यातील 10 शहराचा समावेश करताना पुणे व पिंपरी चिंचवडचा एकत्रित करण्यात आला. मात्र, केंद्र शासनाच्या 100 शहरात पुणे शहराचा समावेश करुन पिंपरी-चिंचवडला वगळण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवडचा “स्मार्ट सिटी’ अभियानात समावेश करावा, याकरिता अनेकांनी प्रयत्न केले. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या तिसऱ्या टप्प्यात नवी मुंबई ऐवजी पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश केल्याचे नगरविकास विभागाने कळविले.

त्यानुसार राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे दि. 31 मार्चला पिंपरी-चिंचवडचा “स्मार्ट सिटी’चा प्रस्ताव कार्योत्तर मान्यतेसाठी देण्यात आला. महापालिकेने “रिट्रोफिट’ या पर्यायाने “स्मार्ट सिटी’चा प्रस्ताव तयार केला आहे. यामध्ये क्षेत्र आधारित विकास व “पॅन सिटी सोल्यूशन’ हे दोन घटक आहेत. यात एकूण 1149.20 कोटी इतक्‍या रकमेचा “स्मार्ट सिटी’ अभियान प्रकल्पांचा समावेश आहे. त्यात क्षेत्र आधारित विकासास 593.67 कोटी तर “पॅन सिटी सोल्यूशन’ 555.53 कोटी असा निधी वितरित होणार आहे. या प्रकल्पात नागरिकांचा अभिप्राय घेवून पिंपळे गुरव – पिंपळे सौदागर क्षेत्राचा समावेश करणेत आला, असे त्यांनी सभागृहास सांगितले.

अशी असेल “एसपीव्ही’ची रचना
स्मार्ट सिटी अभियानच्या विशेष उद्देश वहनच्या अध्यक्ष म्हणून नगर विकासचे प्रधान सचिव नितीन करीर हे असणार आहेत. तर “एसपीव्ही’च्या रचनेत महापालिका, राज्य शासन, केंद्र शासन, स्वतंत्र संचालक यासह 15 संचालक मंडळ असणार आहे. यात महापालिकेचे महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेता, विरोधी पक्षनेता व अन्य दोन पक्षीय नगरसेवक असणार आहेत. महापालिका आयुक्‍त, “एसपीव्ही’चे मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य शासनाचे 4 संचालक, केंद्राचा 1 संचालक, 2 केंद्रीय कंपनी व्यवहार मंत्रालयाचे 2 स्वतंत्र संचालक असणार आहेत.

“स्मार्ट सिटी’त हे होणार
“स्मार्ट सिटी’ अभियानात शहरातील नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा, अखंडीत वीज पुरवठा, स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन, दळणवळण व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, गरीबांना परवडणारी घरे, सक्षम इंटरनेट सुविधा, आरोग्य व शिक्षण सुविधा, “ई गर्व्हनन्स’ व नागरिकांचा सहभाग, शाश्वत पर्यावरण, नागरिकांची सुरक्षा व संरक्षण आदी घटकांचा समावेश असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)