“एसपींनी करून दाखवले”

पोलीस वसाहतीचा प्रश्‍न निकाली; चौक्‍यांना दिले अतिरिक्त कर्मचारी 

प्रशांत जाधव ,सातारा, दि. 23 – 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिल्हा पोलीस प्रमुख पंकज देशमुख यांनी जिल्ह्याची सूत्रे हाती घेताना दिलेले शब्द पाळले आहेत. “प्रभात’ने त्यांची प्रथम मुलाखत घेतली त्यावेळी पोलीस वसाहतीच्या प्रश्‍नासोबतच चौक्‍यांना कर्मचारी पुरेसे नसल्याने चौक्‍या सतत बंद राहत असल्याचे निदर्शनास आणले होते. पंकज देशमुख यांनी त्यावेळी पोलीस वसाहतीचा प्रश्‍न लवकरच निकाली काढू तसेच अपुरे कर्मचारी असलेल्या चौक्‍यांनाही मनुष्यबळ देण्याचे सांगितले होते. त्यानुसार पोलीस वसाहतीचा प्रश्‍न निकाली काढत त्यांनी चौक्‍यांना पुरेसे कर्मचारीही दिले आहेत. त्यामुळे “एसपी पंकज देशमुख यांनी करून दाखवले’ असे बोलले जात आहे.

साताऱ्याचे तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांच्या बदलीनंतर सातारकरांनी त्यांची बदली रद्द व्हावी म्हणून आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यामुळे त्यांची व पोलीस खात्याची जनमाणसात असलेली प्रतिमा जपण्याचे आव्हान स्विकारत पंकज देशमुख यांनी साताऱ्याची सूत्रे हाती घेतली. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना संदीप पाटील यांच्याप्रमाणेच कारभार हाकण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर त्यांनी गुन्हेगारांच्या मुसक्‍या आवळतानाच पोलीस दलातील काही बेशिस्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचा सपाटा लावला. दरम्यानच्या काळात त्यांनी प्रसिध्दीच्या झोकात न राहता आपले काम बोलते ठेवले.

जिल्ह्यातील पोलीस दलाला एका वेगळ्या धाटणीने त्यांनी शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. पोलीस ठाण्यात स्वत: हजेरी लावत लोकांच्या समस्या जाणल्या व त्याचे निराकरन केले. प्रत्येक पोलीस ठाण्याची दप्तर तापासणी स्वत: केली. एसपींची ही कामे जनतेशी निगडीत नसल्याने व संदीप पाटील यांच्या काळात दररोज काही ना काही बातम्या येत असल्याने पंकज देशमुख काहीच करत नसल्याचा लोकांचा गैरसमज झाला होता.

मात्र निरापराध्यांच्या पाठीशी तर अपराध्यांच्या मानगुटीवर बसण्याचा कार्यक्रम त्यांनी आखला होता. त्याची चुणूक दरम्यानच्या काळात दिसू लागली. पोलिस खात्याला शिस्त लावताना त्यांच्या अडचणी जाणून घेत, त्यावर तात्काळ उपाय योजण्याची मोहिम राबवली. त्यामुळे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावण्यास मदत झाली. घोड्याच्या वेगाने धावणारे पोलीस दल पाण्याच्या संत गतीने पळु लागले. मात्र त्या संत गतीला दिशा अन्‌ रणनितीचा अजेंडा असल्याने, जिल्हा पोलीस दलाला मिळालेल्या धोरणी कारभाऱ्यांची धडकी बेशिस्त अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबतच गुन्हेगारांना भरली.

2019 वर्ष उजाडले, पोलीस दलाचा कारभार सुधारल्यानंतर एसपींनी आपला मोर्चा वळवला पोलिसांच्या जिव्हाळ्याचा असलेल्या पोलीस वसाहतीकडे अन्‌ कर्मचाऱ्यांअभावी बंद असलेल्या पोलीस चौक्‍यांकडे. “प्रभात’ने घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी कुठेही कमी पडणार नसल्याचे सांगितले होते.

तसेच कर्मचाऱ्यांअभावी बंद असलेल्या चौक्‍यांची माहिती घेवून कार्यवाही करण्याचेही संकेत दिले होते. अधिकारी फक्त बोलतात अन्‌ कार्यकाळ झाला की, बदलीने जातात (अपवाद) असाच अनुभव होता. मात्र पंकज देशमुख यांनी अवघ्या सात-आठ महिन्यातच पोलीस वसाहतीचा प्रश्‍न निकाली लावला. वसाहतीची जुनी वास्तू पाडण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.

ते झाल्यानंतर लगेच नव्या बांधकामाला सुरूवात केली जाणार आहे. तसेच सातारा शहराच्या हद्दीतील वाढते गुन्हे लक्षात घेता, त्यांनी अपुरे मनुष्यबळ असलेल्या चौक्‍यांना मनुष्यबळ देण्याचे आदेश काढले आहेत. नुकतेच त्यांनी सातारा शहरला दोन सहाय्यक फौजदार, चार हवालदार, दोन पोलीस नाईक, चार पोलीस कॉन्स्टेबल अशी कर्मचार्‍यांची नेमणुक केली आहे.

त्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुख पंकज देशमुख यांनी करून दाखवल्याचीच चर्चा पोलीस दलासह जिल्ह्यात आहे.

… आता लक्ष घरभेद्यांकडे द्या 

एसपी म्हणून तुम्ही खरच चांगले काम करत आहात. लोकांना उगाच त्रास न देण्याच्या सुचना तुम्ही वाहतूक पोलिसांना दिल्या आहेत. लोकांच्या तक्रारी आल्या तर तात्काळ त्याचे निराकरण करत आहात. एकंदरीत पोलीस दलाचा कारभार उत्तम सुरू आहे. प्रजा सुखी आहे. मात्र आता घरभेद्यांच्या भानगडीकडे लक्ष द्या. कारण हे घरभेदी पोलीस खात्यासह सामान्य जनतेला मारक आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)