एसटी भाडेवाढ तुर्तास नाही

file photo

प्रस्ताव नाही : हंगामी दरवाढीचे मात्र संकेत

– नाना साळुंके

पुणे – सातत्याने होणारी इंधन दरवाढ, कर्मचाऱ्यांची वेतनवाढ आणि इतर प्रवासी सवलत यामुळे “लालपरी’ अशी ओळख असलेल्या एसटीच्या तिकीटदरात वाढ होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांच्या काळजाचा ठोकाच चुकला होता. मात्र, भाडेवाढीची ही चर्चा केवळ अफवा असल्याचे समारे आले असून महामंडळ प्रशासनानेही त्याला दुजोरा दिला आहे.

इंधन महागले असले, तरी पूर्वीच्या भाडेवाढीला अजून सहा महिनेही झाले नसल्याने तिकिटांच्या दरवाढीच्या बाबतीत सध्या कोणताही प्रस्ताव नसल्याचे महामंडळाने म्हटले आहे. परंतु दरवर्षीप्रमाणे यंदाही सुट्ट्यांच्या काळात हंगामी दरवाढ होऊ शकते, ही बाब महामंडळाने मान्य केली आहे.

गेल्या काही वर्षांत एसटी महामंडळाचे आर्थिक चाक गाळात रुतत चालले आहे. तर, दुसऱ्या बाजूला तब्बल लाखभर कर्मचाऱ्यांनी गेल्या वर्षी ऐन दिवाळीत वेतनवाढीसाठी संप पुकारला होता. तो दीर्घ काळ झाल्याने एसटी महामंडळाचा तोटा आणखी वाढत गेला. कामगारांच्या या मागणीची दखल घेऊन महामंडळाचे अध्यक्ष व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी कामगारांच्या वेतनात वाढ केली होती. त्याचा आर्थिक भार महामंडळाला सोसावा लागत असून तोटा दिवसेंदिवस अधिकच वाढत चालला आहे.

या संकटातून महामंडळ सुटकेचा मार्ग शोधत असतानाच सातत्याने होणारी इंधनाची दरवाढ महामंडळासाठी धोक्‍याची घंटा ठरत आहे. तर, दुसऱ्या बाजूला विद्यार्थीनींना शिक्षणात प्रोत्साहन मिळावे, यासाठी इयत्ता बारावीपर्यंतच्या विद्यार्थीनींना प्रवासात 100 टक्के सवलत देण्याचा धाडसी निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्यामुळे हा तोटा कमी करण्यासाठी एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्याचा महामंडळाचा प्रस्ताव असल्याच्या चर्चा तीन ते चार दिवसांत जोमात सुरू आहेत. विशेष म्हणजे, सोशल मीडियातून या वृत्ताला अधिकच खतपाणी घालण्यात येत होते. तर, जुन्या दरवाढीला अजून तीन ते चार महिनेदेखील उलटले नसल्याने सर्वसामान्य प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला होता. मात्र, या प्रस्तावित दरवाढीचा तूर्त कोणताही विचार नसल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे.

इंधन दरात सातत्याने वाढ होत असल्याने महामंडळाने काही महिन्यांपूर्वीच एसटीच्या तिकिटांच्या दरात वाढ केली होती. त्यातून महामंडळाला अपेक्षित फायदा झाला नाही, अथवा तोटाही भरुन निघालेला नाही. मात्र, एसटी तिकिटांच्या दरात महामंडळाचा सध्या कोणताही प्रस्ताव नाही.
– रणजितसिंह देओल, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)