एसटी बसने घेतला विवाहितेचा बळी

महाळुंगे इंगळे – पुढे चाललेल्या दुचाकीला पाठीमागे टाकण्याच्या प्रयत्नात पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रेलरची दुचाकीला जोरात धडक बसल्याने दुचाकीवर पाठीमागे बसलेली विवाहिता रस्त्यावर पडली असता त्यांच्याच मागून भरधाव आलेली अन्य एक एसटी संबधित विवाहितेच्या अंगावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीचालक तिचा पती गंभीर जखमी झाला. पुणे-नाशिक महामार्गावरील कुरुळी (ता. खेड) गावच्या हद्दीतील जय मल्हार हॉटेलसमोर गुरुवारी (दि. 18) पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान हा विचित्र अपघात झाला. या अपघातात दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला आहे. विवाहितेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी एसटी चालकास अटक करण्यात आली आहे.
कालिंदा बाजीराव देवकर (वय 33, सध्या रा. सर्वे नं. 218/ए, इंद्रायणी सोसायटी, घरजाई मंदिराजवळ, रुपीनगर तळवडे, ता. हवेली; मूळ रा. डोलकरवाडी, ता. शिरूरकासार, जि. बीड) असे या अपघातात मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तर तिचा पती दुचाकीचालक बाजीराव रघुनाथ देवकर (वय 37) हे गंभीर जखमी झाले आहेत. बाजीराव देवकर यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलिसांनी एसटीचालक राजेंद्र खैरनार (वय 36, रा. पुणे) याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून रात्री उशिरा त्याला अटक केली. बाजीराव देवकर हे आपल्या ताब्यातील दुचाकीवरून (एमएच 14 ईझेड 4426) गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बीड येथे आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी त्यांची पत्नी कालिंदा यांना गाडीवर पाठीमागे बसवून पुणे-नाशिक मार्गावरून रुपीनगर येथून मोशी मार्गे चाकणच्या दिशेकडे जात होते. त्यावेळी त्यांची दुचाकी कुरुळी (ता. खेड) गावच्या हद्दीतील हॉटेल जय मल्हार जवळ आली असता त्यांच्या पाठीमागून भरधाव आलेल्या अनोळखी ट्रेलरची त्यांच्या दुचाकीस जोरात ठोस बसल्याने दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या कालिंदा ह्या जोरात रस्त्यावर पडल्या. तर दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला आहे. यावेळी टेलर चालक (नाव, गाव, पत्ता समजला नाही) घटनास्थळी न थांबता टेलरसह तसाच पुढे वेगात निघून गेला. देवकर हे त्यावेळी आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी करून पत्नी कालिंदा यांना रस्त्यावरून उचलून बाजूला घेण्याच्या प्रयत्नात असतानाच दुर्दैवाने टेलरच्या पाठीमागून पुणे-नवापूर या भरधाव आलेल्या एसटी बसखाली (एमएच 14 बीटी 2370) कालिंदा ह्या क्षणार्धात चिरडल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे पती बाजीराव देवकर हे किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर येथील एका खासगी दवाखान्यात तातडीचे उपचार सुरु आहेत.
एसटीबस चालक राजेंद्र खैरनार यांच्यावर गुन्हा दाखल करून रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संजय घाडगे, मारुतराव सूळ व त्यांचे अन्य सहकारी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)