एसटी देणार मालवाहतूक सेवा

File photo

पुणे – प्रवाशांना सवलतीच्या दरात दर्जेदार सेवा देण्याची ख्याती असलेल्या एसटी महामंडळाने त्यांच्या कारभारात नवनवीन बदल सुरू केले आहेत. त्याबाबतचा आराखडा तयार करण्यात आला असून येत्या दोन महिन्यांत या योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे, या योजनेच्या माध्यमातून शेतीमालाच्या आणि दुधाच्या वाहतुकीला सर्वाधिक प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी या बसेसची आखणी करण्यासाठी महामंडळाच्या वतीने पावले उचलण्यात येत आहेत. विशेष म्हणजे ही योजना अधिक प्रभावी आणि दर्जेदार व्हावी यासाठी सल्लागारांची मदत घेण्यात येणार आहे.

एसटी महामंडळाच्या वतीने राज्यभरात अठरा हजार बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना प्रवासी सेवा पुरविण्यात येत आहे. विशेषत: ग्रामीण भागात ही सेवा अधिक लोकप्रिय झाली आहे. खासगी बसेसच्या स्पर्धेमुळे त्या तुलनेत महामंडळाला तारेवरची कसरत करावी लागत होती, ही बाब लक्षात घेऊन महामंडळाने गेल्या काही वर्षांच्या कालावधीत त्यांच्या कामकाजात अपेक्षेपेक्षाही अधिक सुधारणा केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून वातानुकुलित आणि आरामदायी बसेस ताफ्यात आणल्या आहेत. त्याशिवाय दोन महिन्यांपूर्वीच स्लिपर कोच बसेसही महामंडळाच्या ताफ्यात आल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शेतकऱ्यांकडून मालवाहतुकीसाठी मागणी होत असली तरी महामंडळाने याविषयी कोणतीही पावले उचलली नव्हती. आता उत्पन्न वाढीसाठी मालवाहतुकीची सेवा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महामंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे, त्यासाठी महामंडळाच्या वतीने काही महिन्यांपूर्वी सल्लागारांची नेमणूक करण्यात आली होती. या सल्लागारांनी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समोर यासंदर्भातील सादरीकरणही केले होते, त्यामध्ये काही बदल करून अंतिम अहवाल तयार करण्यात आला आहे.

ज्या भागात मालवाहतुकीची वाहतूक सर्वाधिक होते, याची तपासणी करण्याच्या सूचना सल्लागारांना देण्यात आल्या आहेत, त्याशिवाय या भागात अशी वाहतूक व्यवहार्य आहे का, याची तपासणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या प्रवासाचे अंतर आणि त्याचे भाडे यासंदर्भातही वरिष्ठ अधिकारी सर्व आगार प्रमुखांची मते जाणून घेण्यात येणार आहेत, या प्रक्रियेला आणखी किमान दोन महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. ही सेवा लवकरात लवकर सुरू व्हावी यासाठी महामंडळाच्या वतीने स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात येणार आहे. येत्या दोन महिन्यात ही सेवा सुरू करण्याचा संकल्प महामंडळाने सोडला आहे. अशी माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांनी दिली.

अशी होणार मालवाहतूक
जुन्या बसेसचा मालवाहतुकीसाठी उपयोग
नव्या बसेसचीही होणार खरेदी
नवीन ट्रकही खरेदी करणार
अन्य कंपन्यांपेक्षा देणार सवलतींच्या दरात सेवा


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)