एसटी चालक-वाहकांचे “मेकओव्हर’ अजूनही कागदावरच

– नाना साळुंके

एसटी महामंडळाच्या वाहक आणि चालकांना न्याय देण्यास महामंडळाला तब्बल साठ वर्षांच्या कालवधीतही यश आलेले नाही. महामंडळाला वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळवून देणाऱ्या या कामगारांना आतापर्यंत पगारवाढ आणि अन्य मागण्यांसाठी कायमच लढा द्यावा लागला. त्यातून त्यांना काही प्रमाणात पगारवाढ मिळालीसुद्धा. ही पगारवाढ तुटपुंजी असूनही तब्बल एक लाख कामगारांनी ती गोड मानून घेतली. मात्र, अन्य सुविधा देताना आणि त्यांचा गणवेशाचा “मेकओव्हर’ करताना महामंडळाने हात आखडता घेतला आहे. याबाबतची घोषणा होउन तब्बल दोन वर्षांचा कालावधी उलटूनही त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी अजूनही करण्यात आलेली नाही. त्यामुळे या कामगारांवर असलेला “खाकी वर्दी’ चा शिक्का अजूनही पुसला गेलेला नाही.

हजारो प्रवाशांची सेवा करण्याचे मोलाचे कार्य एसटी महामंडळाच्या हजारो वाहक आणि चालकांनी केले आहे. त्यांच्या या योगदानामुळेच लाखो प्रवाशांना अविरत सेवा मिळत आहे. त्यामुळेच ग्रामीण भागातील प्रवाशी एसटीचे वाहक आणि चालक यांना आजही दैवतासमानच मानतात. मात्र; लाखो प्रवाशांच्या या दैवताची महामंडळानेच आतापर्यंत हेळसांड केली आहे.

वास्तविक महामंडळाला वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळत असतो; हा महसूल मिळवून देण्यात या वाहकांचा सिंहाचा वाटा आहे. उन्हाळा असो अथवा पावसाळा कोणत्याही क्षणी प्रवाशांना अविरत सेवा पुरविण्याचे महत्वपूर्ण काम या वाहक आणि चालकांनी केले आहे; विशेष म्हणजे लाखो नागरिक सणासुदीचा आनंद साजरा करत असताना हे कर्मचारी प्रवाशांना सेवा देण्यासाठी मुक्कामी ड्युटीवर असतात. मात्र; अविरतपणे सेवा पुरविणाऱ्या या लाखो कर्मचाऱ्यांना पगारवाढ आणि अन्य सुविधा मिळविण्यासाठी आतापर्यंत लढाच द्यावा लागला आहे. या लढ्याला काही महिन्यांपूर्वी यश आले; महामंडळाने दिलेली तुटपुंजी पगारवाढ या कर्मचाऱ्यांनी गोड मानून घेतली. मात्र, अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.

त्यातच खाकी वर्दी म्हणजे या कामगारांवर पडलेला शिक्काच आहे; हा शिक्का पुसण्यासाठी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी पुढाकार घेत त्यांचा मेकओव्हर करण्याची घोषणा केली. या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी यासाठी कंपनी आणि कापडाचीही निवड करण्यात आली; त्यामध्ये सात ते आठ महिन्यांचा कालावधी गेला असला तरी निर्णय चांगला असल्याने कामगार संघटनांनीही त्याचे स्वागतच केले. मात्र; तब्बल दोन वर्षांचा कालावधी उलटूनही दिवसेंदिवस हा “मेकओव्हर’ आणखी लांबणीवर पडत चालला आहे. त्यातूनच कामगारांची आणि संघटनांचीही नाराजी वाढत चालली आहे.

पगारवाढ झाली, बोनसची घोषणाही झाली, मात्र खाकी वर्दीचा शिक्का कायमच आहे. दिवाळीच्या आधी हे गणवेश देऊन महामंडळाने त्यांचा सण खऱ्या अर्थाने साजरा केला पाहिजे. अन्यथा या “मेकओव्हर’साठी एसटीचे चाक ऐन सणासुदीच्या काळात थांबायला वेळ लागणार नाही; ही बाब लक्षात घेऊन महामंडळाने त्यासाठी आतापासूनच प्रयत्न करण्याची आवश्‍यकता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)