एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच बोनस

दिवाकर रावते यांची घोषणा : आंतरविभागीय नाट्य स्पर्धेचे उद्‌घाटन

पुणे – राज्य परिवहन (एसटी) महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना दोन वर्षांपूर्वी (एप्रिल 2016) जाहीर करण्यात आलेली वेतनवाढ प्रत्यक्षात दिली गेली नाही. मात्र, आता या दिवाळीपूर्वी मागील दोन वर्षांतील वेतनवाढीवरील फरकाची थकबाकी एकरकमी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळतर्फे आयोजित 47 व्या आंतरविभागीय नाट्य स्पर्धेचे उद्‌घाटन रावते यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहनचे कर्मचारी व औद्योगिक सबंध महाव्यवस्थापक माधव काळे, आंतराष्ट्रीय प्रयोगकला आणि संशोधन संस्थेचे संचालक प्रसाद वनारसे, पुणे विभागीय नियंत्रक यामिनी जोशी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील तसेच एसटी कर्मचारी उपस्थित होते.

रावते म्हणाले, दोन वर्षांपूर्वी कर्मचाऱ्यांना वाढीव पगारवाढ जाहीर करण्यात आली होती. यानंतर आता या दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना वेतनवाढीवरील फरकाची थकीत रक्‍कम एकरकमी देण्यात येणार आहे. महामंडळाचे काम करत असताना कामगारांच्या संवेदना जपत काम करण्याचा प्रयत्न करत असून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न आहे. महामंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या नाट्य स्पर्धा अभिमानास्पद असून यामुळे कर्मचाऱ्यांमधील कलाकार दिसून येतो. एसटी कर्मचारी सादर करत असलेल्या नाटकांचे व्यावसायिक रंगभूमीत सादरीकरण व्हावे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. नाटक ही एक निर्मिती आहे ते निर्माण करण्याचे सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे तो आयुष्यात पुढे जातो. एसटी महामंडळाच्यावतीने अशा प्रकारे नवनवीन उपक्रम राबवून कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचीही भावनाही त्यांनी व्यक्‍त केली.

माधव काळे म्हणाले, सध्या माहिती तंत्रज्ञानाचा वेग झपाट्याने वाढत असून यामुळे कुटुंबातील संवाद हारवत चालला आहे. नाटकाच्या माध्यमातून समाजात होत जाणारा बदल मांडण्याचा प्रयत्न केलेला असून ते सर्वांच्या जीवनाशी निगडीत आहे. अशा प्रकारच्या कलेमधून स्वतः बरोबरच इतरांनाही आनंद मिळतो. कार्यक्रमाचे आभार विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी मांडले.

नाट्यविजेत्या संघालाही वेतनवाढ
एसटी महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणारा नाट्य स्पर्धेचा उपक्रम महत्त्वाचा असून यामुळे कर्मचाऱ्यातील कलाकार दिसून येतो. नाट्यस्पर्धेत विजेतेपद मिळवणाऱ्या संघाला वेतनवाढ देण्यात येईल. तसेच, स्पर्धेत सुवर्णपदक, रौप्यपदक आणि कांस्यपदक मिळवणाऱ्यालाही वेतनवाढ देण्याची घोषणा यावेळी रावते यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)