एसटी कर्मचाऱ्यांचा ओव्हरटाईम बंद

पुणे – प्रवाशांच्या सुरक्षेचे कवच आणखी बळकट करण्याचा महत्तवपूर्ण निर्णय एसटी महामंडळाच्या वरिष्ठ कार्यालयाने घेतला आहे. त्यानुसार मनुष्यबळ नसले तरी कोणत्याही चालक अथवा वाहकाला डबल ड्युटी न देण्याचे संकेत महामंडळाने दिले आहेत, गरज भासल्यास वाहक आणि चालकांच्या रजा रद्द करा, असे आदेशही या कार्यालयाने काढले आहे. राज्याच्या सर्व आगारांमध्ये या निर्णयाची तातडीने आणि काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे चालक आणि वाहकांचा ओव्हरटाईम बंद होणार असला तरी त्यांच्यावरील अतिरिक्‍त कामाचा ताणही कमी होणार आहे.

एसटी महामंडळाच्या राज्यभरातील आगारांमध्ये साध्या, निमआराम, वातानुकुलित, शिवशाही, अश्‍वमेध, हिरकणी आणि स्लिपर कोच अशा 19 हजार 500 बसेस आहेत. त्यासाठी 70 ते 80 हजार वाहक आणि चालक कार्यरत आहेत. बसेसच्या आणि प्रवाशांच्या तुलनेत हे वाहक आणि चालक खूपच कमी आहेत, विशेषत: ग्रामीण भागातील आगारांमध्ये या तुटीचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे कमी मनुष्यबळात प्रवाशांना सेवा देताना संबंधित आगार प्रमुख अथवा वाहतूक नियंत्रकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे, त्यावर पर्याय म्हणून ड्युटी पूर्ण करून पुन्हा आगारात येणाऱ्या वाहक आणि चालकांना पुन्हा कामावर पाठविण्यात येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या पर्यायामुळे प्रवाशांची आणि पर्यायाने महामंडळाची सोय होऊन त्या माध्यमातून महामंडळाला महसूलही मिळत होता. मात्र, सलग अठरा ते वीस तास काम केल्याने वाहक आणि चालकांवरील कामाचा ताणही वाढला होता. तसेच अपघातांची संख्याही वाढली होती, त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचाही गहन प्रश्‍न निर्माण झाला होता. परिणामी एसटी बसेसची आणि महामंडळाची विश्‍वासार्हताही धोक्‍यात आली होती, त्याची गंभीर दखल घेऊन महामंडळाच्या वरिष्ठ कार्यालयाने त्यासंबंधीचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे परिपत्रक एसटी महामंडळाच्या वतीने जारी करण्यात आले आहे.

वाहक, चालकांची निवासस्थाने स्वच्छ करणार
एसटी महामंडळाच्या अनेक बसेस आगारात मुक्‍कामी असतात. त्याठिकाणी राहण्यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने सोय करण्यात आली आहे. मात्र, यातील बहुतांशी निवासांमध्ये गैरसोय आणि अस्वच्छता आहे. त्यातूनच वाहक आणि चालकांमध्ये आजारांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. याची दखल महामंडळाने घेतली असून त्याठिकाणच्या स्वच्छतेवर आगामी काळात भर देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)