एसटी अधिकाऱ्यांवर भडकले अर्थमंत्री

निधी मंजूर करूनही मिनीबसची खरेदी नाही : आढावा बैठक

पुणे – भीमाशंकर विकास आराखडा आढावा बैठकीत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार एसटीच्या अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले. या विकास आराखड्यामध्ये 40 मिनीबस घेण्यासाठी 4 कोटी 75 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यासंबंधिच्या सूचना जानेवारी महिन्यातच देण्यात आल्या आहेत. मात्र, असे असतानाही एसटी प्रशासनाकडून अद्याप त्याबाबत कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे मिनीबसची संख्या कमी करून त्यात लाल गाड्या खरेदी करायच्या आहेत का? तुम्ही वेगळा पायंडा पाडण्याचा प्रयत्न करू नका, अशा शब्दांत मुनगंटीवार यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना सुनावले.

विधानभवन येथे भीमाशंकर विकास आराखडा आढावा बैठक अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, वन विभागाचे सचिव विकास खरगे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, पुणे ग्रामिण पोलीस अधिक्षक संदिप पाटील आदी उपस्थित होते.

भीमाशंकर येथे दररोज हजारो भाविक भेट देतात. तसेच श्रावण महिन्यात भाविकांची संख्या लाखांवर जाते. त्यामुळे शासनाने भीमाशंकर देवस्थानचा विकास आराखडा मंजूर केला आहे. या आराखड्यात भाविकांनी पार्किंग ते मंदिर अशी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी 40 मिनीबस खरेदीचा निर्णय झाला आहे. त्यासाठी आराखड्यात 4 कोटी 75 लाख रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला असून जानेवारी महिन्यातच खेरदीसंबंधिच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, अद्याप या बसेसची खरेदी झालेली नाही. या गोष्टीवरून मुनगंटीवर भडकले. त्यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना थेट या गोष्टीचा जाब विचारला. गाड्या खरेदी करण्याचे काम अवघ्या 15 दिवसांचे आहे. त्याला एवढा विलंब का? असा जाब त्यांनी विचारला.

दरम्यान, तुमच्याकडे चालक, वाहकांचा प्रश्‍न निर्माण होत असेल तर 40 ऐवजी सुरुवातीला 20 ते 25 बस खरेदी करा. उर्वरित बस कालांतराने खरेदी करा. मात्र, या बस खरेदी करताना आणि सेवा देताना कल्पकता वापरा. या बसला आकर्षक रुप द्या. बसमध्ये बसल्यानंतर भाविकांच्या मनात श्रद्धा निर्माण व्हावी, अशी बस तयार करा. त्यात एक टिव्ही असावा. ज्यावर महादेवाचा अभिषेक, आरती, पुजा दाखविली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

पुन्हा निधी नाही असे सांगू नका!
कुठे निधी उपलब्ध नसेल तर माहिती द्या, लगेच निधी उपलब्ध करून देवू. मात्र, पुढच्या आढावा बैठकीत निधी उपलब्ध नाही, अस सांगू नका असे मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. तसेच महाराष्ट्राचे काम देशाच्या कानाकोपऱ्यात जाईल, असे काम करा आणि तेही वेगाने करा, अशी सूचनाही त्यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)