एसटीच्या संपामुळे लिलाव लांबणीवर

पिंपरी – एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे भंगार झालेल्या एसटी बसेसचा लिलाव लांबणीवर पडला आहे.

वेतनवाढ करार मान्य नसल्याचे सांगत एसटी कर्मचाऱ्यांना संपाचे हत्यार उगारले होते. दोन दिवस संप चालु होता. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले तर एसटी प्रशासनालाही अनंत अडचणींचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे एसटी महामंडळाकडून करण्यात येणारा भंगार मालाचा लिलाव लांबणीवर टाकावा लागला.
संपुर्ण जिल्ह्यातून वैधता संपलेल्या गाड्या पुण्यातील मुख्य परिवहन महामंडळाच्या कार्यालयात जमा होतात. ठराविक काळानंतर गाड्यांचा लिलाव करण्यात येतो त्यातुन करोडोचे उत्पन्न एसटी महामंडळाला मिळते.

यापूर्वी जानेवारी 2018 मध्ये लिलाव झाला होता. त्यातुन महामंडळाला सव्वा कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. एसटी महामंडळाकडून दरवर्षी भंगार गाड्यांचा लिलाव करण्यात येतो. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे यावेळचा लिलाव पुढे ढकलण्यात आला आहे. 21 जुनला हा लिलाव होण्याची शक्‍यता आहे. भंगारात निघालेल्या सुमारे 130 गाड्यांचा लिलाव केला जाणार आहे.

भंगारात जमा झालेल्या व वैधता संपलेल्या गाड्या स्वारगेट येथे जमा केल्या जातात. नंतर गाड्यांचे महत्त्वाचे भाग काढून घेऊन नंतर भंगार म्हणून लिलाव करण्यात येतो. स्वारगेट येथे भंगार गाड्यांना उभ्या करायला जागा पुरत नसल्याने 42 गाड्या वल्लभनगर आगारात ठेवण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या दापोडीतील वर्कशॉप येथे उभ्या केल्या आहेत. या दोन्ही ठिकाणी जागेचा अभाव असताना कसेबसे या गाड्यांचा भार आगार प्रशासन संभाळत आहेत. भंगारात जमा झालेल्या वाहनांच्या स्पेअर पार्टच्या चोरीची भिती असते. रत्नागिरी येथील आगारात लिलावाच्या दिवशीच भंगार मालाला आग लागण्याची घटना घडली होती. त्यामुळे एसटी प्रशासन धास्तावले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)