एसटीच्या धडकेने दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

तळेगाव दाभाडे : तळेगाव खिंडीत एसटी बसच्या धडकेत चक्‍काचूर झालेली दुचाकी.
  • बसचालक ताब्यात : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील घटना

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – गणेशोत्सव मंडळाच्या पूजेचे साहित्य आणण्यासाठी दुचाकीवरून सोमाटणे (फाटा) कडे जाताना त्यांच्या दुचाकीला भरधाव एसटी बसची मागून जोरात धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर तळेगाव दाभाडे खिंडीत मारुती मंदिरासमोर रविवारी (दि. 27) सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी एसटी बसचालकाला ताब्यात घेतले आहे.

सिद्धराम मलाप्पा बंदिछोडे (वय 21) व संकेत संतोष गुंडाळ (वय 17, रा. खंडोबा माळ, संभाजीनगर, तळेगाव दाभाडे, ता. मावळ) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सव मंडळाच्या पूजेचे साहित्य आणण्यासाठी त्यांच्या दुचाकीवरून (एम. एच. 14 बी. पी. 2314) सिद्धराम बंदिछोडे व त्याचा मित्र संकेत गुंडाळ हे खंडोबा माळ, संभाजीनगर, तळेगाव दाभाडे) सोमाटणे फाटा येथे जात होते. त्यांची दुचाकी जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर तळेगाव दाभाडे खिंडीत मारुती मंदिरासमोर रविवारी (दि. 27) सकाळी साडेदहाच्या सुमारास आली. पुणे बाजूला जाणाऱ्या भरधाव (एम. एच. 20 बी. एल. 4165) क्रमांकाच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसची दुचाकीला मागून जोरात धडक बसली. यामध्ये दुचाकीवरील दोन्ही युवक गंभीर जखमी झाले. दुचाकीचा चक्‍काचूर झाला होता. काही तास तळेगाव खिंडीत वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

घटनास्थळी सहाय्यक निरीक्षक गिरीश दिघावकर, पोलीस कर्मचारी संतोष मोरे, संदीप बनकर व स्थानिकांनी त्यांना वैद्यकीय उपचारासाठी सोमाटणे फाटा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. एसटी बसचालक विष्णू मारुती घुले (वय 43, रा. जामखेड, जि. अहमदनगर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे करत आहेत. संकेत गुंडाळ हा तळेगाव दाभाडे येथील आदर्श विद्या मंदिर ज्युनिअर कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेत अकरावीच्या वर्गात शिकत होता. सिद्धराम बंदिछोडे हा प्लंबिंगचे काम करत होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)