एसटीच्या ‘खडखडाट’पेक्षा ट्रॅव्हल्सची भाडेवाढी बरी

पुणे – उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे एसटीला होणारी गर्दी, अनेकदा आरक्षण न मिळाल्यामुळे होणारी नाराजी आणि काही प्रवाशांना एसटीचा न पटणारा “खडखडाट’ या सगळ्या परिस्थितीचा फायदा खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांना होत आहे. जादा सुविधांना भुरळून प्रवासी देखील खासगी ट्रॅव्हल्सचा पर्याय निवडत आहेत. मात्र, सुविधांकडे पाहताना प्रवासी ट्रॅव्हल्सच्या भाडेवाढीकडे मात्र दुर्लक्ष करत आहेत.

उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्यावर प्रत्येकाला गावी जाण्याची ओढ लागते. सुट्टीसाठी गावी जाणाऱ्यांची गर्दी सध्या स्वारगेट, पुणे स्टेशन आणि शिवाजीनगर परिसरामध्ये प्रामुख्याने पाहायला मिळत आहे. प्रवाशांच्या मागण्यांनुसार सुविधा देणार असल्याचे सांगत खासगी ट्रॅव्हल्सकडून अव्वाच्या सव्वा दर आकारले जातात. प्रवाशांच्या बदलत्या पसंतीमुळे ट्रॅव्हल्स कंपन्यांची भाडे वाढले आहे. याविषयी प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

सुट्टी आणि गर्दीच्या हंगामात बक्कळ कमाई करण्यासाठी या मार्गावरील खासगी ट्रॅव्हल्स चालक-मालकांकडून तिकीट दरात दुप्पट वाढ केली जात आहे. एसटी महामंडळातील वातानुकूलित “शिवशाही’ बससेवेबाबत तक्रारी असून, त्याबाबत कार्यवाही होत नसल्याने प्रवाशांनी या सेवेकडे पाठ फिरवली आहे. एकंदरित रेल्वेचे वेटींग आणि प्रवाशांच्या मनात महामंडळाबाबत असणारी नाराजी यामुळे प्रवाशांना नाईलाजास्तव खासगी ट्रॅव्हल्स चालकांची मनमानी दरवाढ निमूटपणे सहन करावी लागत असल्याची खंत प्रवाशांनी व्यक्त केली.

…तर “आरटीओ’कडे तक्रार करा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी तिकीट दराच्या दीडपटीपेक्षा जादा भाडेदर आकारण्यास शासनाची परवानगी नाही. जादा प्रवास दराची आकारणी केल्यास प्रवाशांनी प्रवास तिकीटाच्या पुराव्यासह तपशील देऊन परिवहन कार्यालयास टपालाद्वारे अथवा (र्तो.12. म्ह्‌.गोव्‌.इन) या संकेतस्थळावर ई-मेलद्वारे तक्रार करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात येत आहे.

पुणे ते अंबाजोगाई असा प्रवास मी नेहमी करतो. सुट्टीमध्ये एसटीला गर्दी असल्याने आम्हाला ट्रॅव्हल्सने जाण्याशिवाय पर्याय नसतो. मात्र, या काळात त्याचे वाढणारे दर पाहता एसटी आणि ट्रॅव्हल्समध्ये तफावत जाणवते. एसटीच्या काही गाड्यांची अवस्था पाहता अनेकदा प्रवास करताना ट्रॅव्हल्सचा मार्ग निवडला जातो. खासगी कंपन्यांच्या सेवा चांगल्या असतात, पण ही दरवाढ न करता एक ठराविक प्रवास भाडे निश्‍चित करून सेवा दिल्यास प्रवाशांना दिलासा मिळू शकतो.
– रत्नदीप शिंदे (प्रवासी)

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)