एसटीचे वाहकही पदोन्नतीने होणार “नियत्रंक’

सेवा ज्येष्ठतेला प्राधान्य; लेखी व तोंडी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्‍यक


एसटी महामंडळाच्या स्थापनेपासून वाहक आणि चालकांना पदोन्नती नाही

पुणे – वर्षानुवर्षे धक्‍के खात आणि प्रवाशांना उच्च दर्जाची सेवा देण्याचा प्रयत्न करणे, सणासुदीलाही मुक्‍कामी असणे आणि तरीही कमी पगारात नोकरी करणे या सर्व प्रकारांना एसटीचा वाहक त्रस्त झाला आहे. मात्र, या वाहकांना दिलासा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. या वाहकांना विभाग नियत्रंकपदी पदोन्नती देण्यात येणार आहे, त्यासंदर्भातील परिपत्रक महामंडळाच्या वतीने जारी करण्यात आले असून त्याबाबतची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे; परंतु या पदोन्नतीसाठी वाहकांना लेखी आणि तोंडी परीक्षा द्यावी लागणार आहे.

एसटी महामंडळाच्या स्थापनेपासून वाहक आणि चालकांना पदोन्नती मिळत नव्हती, त्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर होता. यासंदर्भात अनेक कामगार संघटनांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता, तसेच हा प्रश्‍न मार्गी लागावा यासाठी आंदोलने आणि प्रसंगी संपाचेही हत्यार उपसले होते. दिवाकर रावते यांनी राज्याच्या परिवहन मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर हा प्रश्‍न निकाली काढण्याचा चंग त्यांनी बांधला होता, त्यासाठी त्यांनी कायद्यात आणि नियमात बदल करण्याच्या सूचना संबंधित पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार तीन महिन्यांपूर्वी याबाबत हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या, त्याबाबतची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या वाहकांना सेवाज्येष्ठतेनुसार विभाग नियत्रंक पदावर पदोन्नती देण्याचा निर्णय महामंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एसटी महामंडळात वाहकांची संख्या जास्त आहे, त्यामुळे या पदावर पदोन्नती देताना आणि त्यांना नियुक्‍तीचे ठिकाण देताना महामंडळाला अडचणींचा सामना करावा लागणार आहे. ही बाब लक्षात आल्यानतर महामंडळाने वाहकांसाठी सेवाज्येष्ठतेचा पर्याय निवडला असून परीक्षाही सक्‍तीची करण्यात आली आहे. लेखी परीक्षा आणि तोंडी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच संबंधित वाहकाला पदोन्नती देण्यात येणार आहे, परीक्षा घेण्यासाठी लवकरच तारखा जाहीर करण्यात येणार आहेत. त्यानुसार राज्यभरात त्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांनी दिली.

चालकांच्या पदोन्नतीच्या संदर्भात विचार सुरू
एसटी महामंडळाच्या स्थापनेपासून वाहक, चालक आणि अन्य प्रवर्गातील कर्मचारी हा नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे. त्यामुळे यापूर्वी अनेकदा कामगार संघटनांनी महामंडळ आणि त्या त्या वेळेच्या परिवहन मंत्र्यांकडे दाद मागितली होती. मात्र, त्यांना आश्‍वासनाच्या शिवाय काहीच मिळाले नव्हते. तब्बल तीस ते चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत हा प्रश्‍न मार्गी लागला असून त्यातून वाहकांना दिलासा मिळाला आहे, त्याच पद्धतीने चालकांना कशाप्रकारे पदोन्नती देता येईल यासंदर्भात महामंडळाच्या वतीने विचार करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)