एसटीची हंगामी भाडेवाढ आजपासून

सरसकट सर्व बसेसना 10 टक्‍के वाढ लागू


1 ते 16 नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार

पुणे – कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन एसटी महामंडळाने तिकीट दरवाढीच्या संदर्भात एक पाऊल मागे घेतले आहे. त्यानुसार महामंडळाच्या वतीने यापूर्वी तिकिटांच्या दरात करण्यात आलेली हंगामी दरवाढ आता 20 ऐवजी 16 नोव्हेंबरपर्यंतच ठेवण्यात येणार आहे.

शासनाने मंजूर केलेल्या भाडेवाढ सूत्रानुसार यावर्षी सरसकट एसटीच्या सर्व गाड्यांना 10 टक्‍के लागू करण्यात आली आहे. त्यामध्ये साधी, जलद, रात्रसेवा निमआराम आणि वातानुकूलित शिवशाही आसनी या सेवा प्रकारांचा समावेश आहे. यामुळे 1 ते 16 नोव्हेंबर या कालावधीत वाढीव भाडेदराची आकारणी करण्यात येणार आहे. गतवर्षी या कालावधीत सेवाप्रकारनिहाय 20, 15 आणि 10 टक्‍के अशी भाडेवाढ केली होती. मात्र, यावर्षी सरसकट सर्व बसेसना 10 टक्‍के भाडेवाढ लागू करण्यात आली आहे. पुण्यातील शिवाजीनगर, स्वारगेट आणि पुणेस्टेशन याठिकाणावरून प्रवाशांना जादा बसेसची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या व्यतिरीक्त प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता कॅन्टॉन्मेंट बोर्ड परिसरातून बसेस सोडण्यात येणार आहेत.

महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांनी त्यासंदर्भातील परिपत्रक जारी केले आहे. दरम्यान, महामंडळाची हंगामी दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. त्याबाबत सर्व आगारांना आणि आगार प्रमुखांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत.

शहरातील प्रवाशांसाठी येथून सुटतील जादा बसेस
पुण्यातून दि. 1 ते 6 नोव्हेंबरदरम्यान नियमित गाड्यांबरोबरच जादा बसेस सोडल्या जाणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे. वाकडेवाडी येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड मैदान येथून मराठवाडा, खान्देश, विदर्भासाठी जादा बसेस सोडल्या जातील. स्वारगेट, शिवाजीनगर, पिंपरी-चिंचवड आगारातून अन्य भागांत जाणाऱ्या बसेस सोडण्यात येतील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)