एसटीचा बनावट पास अवघ्या शंभर रुपयांत

File photo

राज्यभरात टोळी सक्रीय


केंद्रबिंदू आणि छपाई पुण्यातच


महामंडळाला महिन्याकाठी कोट्यवधींचा घाटा


महामंडळ आणि अधिकाऱ्यांमध्ये खळबळ

– नाना साळुंके

पुणे – आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या एसटी महामंडळावर आणखी एक महासंकट ओढवले आहे. जेष्ठ नागरिक, मासिक आणि साप्ताहिक असे बनावट पास अवघ्या शंभर रुपयांमध्ये तयार करुन देणारी टोळीच राज्यभरात सक्रीय असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे; विशेष म्हणजे या टोळीचा म्होरक्‍या आणि या बनावट पासचे केंद्रबिंदू पुणे शहर तसेच जिल्हा असल्याचे उघडकीस आले आहे. त्यानुसार या बनावट पासची छपाई आणि विक्री पुण्यातील एका खासगी छपाई केंद्रातून होत असल्याची माहिती एसटी महामंडळाला मिळाली आहे; त्यानुसार त्याची माहिती मिळविण्यासाठी महामंडळाच्या वतीने प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. या बनावट पासच्या माध्यमातून एसटी महामंडळाला महिन्याकाठी कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचे अधिकारी आणि प्रशासनामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एसटी महामंडळाचे जाळे राज्याच्या सर्व भागामध्ये विशेषत: खेडोपाडी आणि गावागावात पसरले आहे. राज्यभरात दररोज किमान अकरा ते बारा हजार बसेस धावत असतात, या बसेसच्या माध्यमातून दररोज किमान पंचवीस ते तीस लाख प्रवासी प्रवास करत असतात. त्यामध्ये विद्यार्थी आणि नोकरदारांची संख्या सर्वाधिक आहे; त्यामुळे एसटी महामंडळाने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी महामंडळाच्या स्थापनेपासूनच प्रवासी केंद्रित योजना सुरु केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नोकरदारासांठी मासिक, त्रैमासिक, सहामाही पास योजना सुरु केल्या आहेत. या पासच्या माध्यमातून दररोज एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या किमान साडेचार ते पाच लाखांच्या आसपास आहे, त्याद्वारे महामंडळाला महिन्याकाठी कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळत असतो. त्यामुळेच महामंडळाच्या वतीने या पासधारकांसाठी विविध योजना जाहीर करण्यात आल्या आहेत, विशेष म्हणजे अनेक प्रवासी या योजनांचा लाभ घेत असून त्यामध्ये ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे.

नेमका हाच धागा या रॅकेटने पकडला आहे; त्यानुसार हे बनावट पास तयार करण्यासाठी या रॅकेटने पुणे हेच केंद्र निवडले आहे. त्यासाठी पुण्यातूनच या बनावट पासची छपाई करण्याचा प्रताप या रॅकेटने केला आहे; विशेष म्हणजे पुण्यातूनच अवघ्या शंभर ते दोनशे रुपयांमध्ये राज्यभरात या पासेसचे वितरण होत आहे. हे वितरण करण्यासाठी या रॅकेटने त्यांच्या मर्जीतील खास माणसांची नेमणूक केली आहे; या रॅकेटमधील तीन भामट्यांना काल लातूर येथील एसटी महामंडळाच्या तपास पथकाने रंगेहाथ पकडले असून त्यांच्याकडे तपास सुरु करण्यात आला आहे. या प्रकाराने महामंडळ आणि त्यांच्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. त्यानुसार राज्यभरातील सर्व आगारातील वाहक आणि तिकिट तपासनीसांना सावध राहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याबाबत आगार प्रमुखांकडून सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती एसटी कामगार सेनेचे विभागीय सचिव नामदेवराव कार्ले आणि केंद्रीय कार्यकारिणी सदस्य शंकरराव भिलारे यांनी दिली.

दोषींची गय नाही : यामिनी जोशी
हे रॅकेट पुण्यात कार्यरत असल्याच्या सूचना मुख्य कार्यालयाकडून मिळाल्या आहेत; त्यामुळे केवळ पुणे आगारच नव्हे तर संपूर्ण एसटी महामंडळाला त्याचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. या प्रकाराची पुणे विभागाने गंभीर दखल घेतली आहे; त्यानुसार सर्व प्रकारच्या पासेसची कसोशीने तपासणी करण्याच्या सूचना सर्व वाहक आणि तिकिट तपासनीसांना दिल्या आहेत. यामध्ये दोषी आढळणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही, असे महामंडळाच्या विभागीय नियंत्रक यामिनी जोशी यांनी सांगितले.

रॅकेटचा पर्दाफाश करूच : उल्हास बढे
महामंडळ आणि बनावट पास कसे ओळखावेत यासंदर्भात सर्व वाहकांना मार्गदर्शन करण्यात आले आहे; त्याशिवाय वाहकांमध्येही जनजागृती करण्यात आली आहे. तसेच पासधारक प्रवाशांच्या पासमध्ये काही तफावत आढळल्यास थेट मुख्य कार्यालयाशी संपर्क साधण्याच्या सूचना सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत; त्या माध्यमातूनच बनावट पासधारकांची संख्या कमी करण्याचा आणि या रॅकेटचा पर्दाफाश करण्याचा आमचा मानस आहे, असे स्वारगेटचे डेपो सचिव उल्हास बढे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)