एसटीकडून जादा गाड्यांची “दिवाळी भेट’

File photo

गरज भासल्यास संख्या वाढणार : सर्वच आगारांकडून नियोजन पूर्ण

पुणे – दिवाळीत गावी आणि पर्यटनासाठी जाणाऱ्यांच्या सेवेसाठी एसटी महामंडळ प्रशासन सज्ज झाले आहे. त्यासाठी आपल्या ताफ्यातील सर्व बसेस मार्गावर आणण्याचा निर्णय घेतला असून राज्यात दररोज सर्व मार्गावर हजार ते अकराशे जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. तसेच गरज भासल्यास आणि गर्दी असल्यास या बसेसची संख्या वाढविण्यात येणार आहे. त्याबाबत सर्व आगार प्रमुखांना नियोजन करण्याच्या सूचना वरिष्ठ कार्यालयाने दिल्या आहेत. त्यानुसार सर्वच आगारात हे नियोजन पूर्ण झाले आहे. त्यातून किमान वीस ते पंचवीस टक्‍के महसूल वाढविण्याचा संकल्प प्रशासनाने सोडला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गावागावांत आणि खेड्यापाड्यांत पोहोचलेली सेवा ही एसटी महामंडळाच्या बसेसची ख्याती आहे. त्याशिवाय सुरक्षित प्रवास होत असल्याने खासगी बसेसच्या स्पर्धेच्या काळातही एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या फारशी कमी झालेली नाही. दिवाळी आणि सुट्ट्यांच्या कालावधीत प्रवाशांची संख्या कमी झालेली नाही. त्यासाठीच महामंडळाच्या वतीने दिवाळी, नाताळ, उन्हाळा आणि अन्य सुट्ट्यांच्या कालावधीत प्रवाशांच्या सेवेसाठी बसेसचे नियोजन करण्यात येत असते. विशेष म्हणजे दरवर्षीच महामंडळाच्या या उपक्रमाला प्रवाशांचाही अपेक्षित प्रतिसाद मिळत असल्याने या बसेसच्या आणि त्यांच्या फेऱ्यांच्या संख्येत वाढ करण्यात येते.

त्याच धर्तीवर महामंडळाच्या वतीने यंदाही या जादा बसेस आणि फेऱ्यांचे नियोजन केले आहे. त्याबाबत महामंडळाच्या वतीने गेल्या दोन महिन्यांपूर्वीच सर्व आगार प्रमुखांना आणि विभाग नियंत्रकांना नियोजना संदर्भात सूचना दिल्या होत्या. तसेच जादा गर्दी आणि बसेसची मागणी असलेल्या मार्गांची यादी तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार सर्व आगारांचे याबाबतचे नियोजन पूर्ण झाले आहे. या नियोजनानुसार येत्या 1 ते 20 नोव्हेंबर दरम्यान जादा बसेस सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांनी दिली.

सव्वा लाख कर्मचारी दिमतीला
बसेस आणि जादा गाड्यांचे नियोजन करतानाच महामंडळाच्या वतीने कर्मचाऱ्यांचेही नियोजन करण्यात आले आहे. दिवाळी कालावधीत प्रवाशांना दर्जेदार आणि सुरळीत सेवा मिळावी यासाठी प्रवाशांच्या दिमतीला तब्बल सव्वालाख कर्मचारी असणार आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्ट्या आणि रजा रद्द केल्या आहेत. शिवाय, गरज भासल्यास त्यांना वैद्यकीय सुविधाही पुरविण्यात येणार आहेत. सर्व बसेसची दुरुस्ती आणि देखभाल करण्याच्या सूचना मेन्टनन्स विभागाला देण्यात आल्या आहेत, अशीही माहिती देओल यांनी दिली.

प्रमुख मार्गांचे आरक्षण पूर्ण
प्रवाशांना सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा मिळावी यासाठी महामंडळाच्या वतीने विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या सुट्ट्यांसाठी महामंडळाच्या वतीने दोन महिने अगोदरच आरक्षण सुरू केले होते. विशेष म्हणजे पहिल्या दिवसापासूनच आरक्षणाला उत्तम प्रतिसाद मिळाला. राज्यातील सर्व प्रमुख आणि महत्त्वाच्या शहरांमधील आरक्षण पहिल्या काही दिवसांमध्येच फुल्ल झाले, अशीही माहिती महामंडळाच्या वतीने देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)