एसजीएसटी आणि यूजीएसटी कायद्याला मान्यता

नवी दिल्ली – वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीच्या आज झालेल्या बैठकीत राज्य वस्तू आणि सेवा कर विधेयक अर्थात एसजीएसटी आणि केंद्रशासित प्रदेश वस्तू आणि सेवा कर विधेयकाला मान्यता मिळाली असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दिली. जेटली यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटीची ही 12 वी बैठक नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जेटली यांनी आज राज्यांचे अर्थमंत्री तसेच तज्ञांबरोबर जीएसटी कायद्यावर चर्चा केली. मागील बैठकीत निर्णय होऊ न शकलेल्या एसजीएसटी आणि यूजीएसटीला आज मान्यता देण्यात आली आहे.

दरम्यान, जीएसटीची 13 वी बैठक 31 मार्चला दिल्लीत होणार असल्याचेही जेटली यांनी स्पष्ट केले आहे. जीएसटी संदर्भात केलेले कायदे आता मंजूरीसाठी मंत्रिमंडळाकडे पाठवण्यात येणार असून त्यानंतर ते लोकसभेत सादर केले जातील असेही जेटली यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, नोंदणी, पावत्या आणि परतावा यासंबंधी कायद्यांना यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता जुलैपासून जीएसटी लागू करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. जीएसटी परिषदेच्या याआधी झालेल्या बैठकीत केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अर्थात सीजीएसटी आणि इंटीग्रेटेड वस्तू आणि सेवा कर अर्थात आयजीएसटी कायद्याच्या मसुद्याला मान्यता मिळाली होती. मागील महिन्यात मसुदा भरपाई विधेयकाला जीएसटी परिषदेत मान्यता देण्यात आली होती, तसेच संसदेच्या पुढील अधिवेशनात हे विधेयक संसदेत सादर करण्यात येणार आहे.

“जीएसटी’ अंतर्गत शीतपेये, आलिशान कार आणि चैनीच्या वस्तूंवरील अधिभाराची मर्यादा 15 टक्के निश्‍चित करण्यात आली आहे. बीडी “जीएसटी’च्या कक्षेबाहेर ठेवण्यात आल्या आहेत, तर तंबाखू उत्पादनांसाठी अधिभार अधिभाराची स्वतंत्र मर्यादा मंजूर करण्यात आली आहे. -अरुण जेटली, अर्थमंत्री

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)