एसकेएफ क्रेडिट सोसायटीतर्फे अकरा टक्‍के लाभांश

पिंपरी – चिंचवड येथील एसकेएफ इंडिया एम्प्लॉइज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने 2017-2018 या आर्थिक वर्षात दोन कोटी एक लाख बेचाळीस हजार सहाशे साठ रुपयांचा नफा कमविला असून अकरा टक्के लाभांश जाहीर केला आहे. संस्थेच्या नुकत्याच झालेल्या 52 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभेचे अध्यक्ष चंद्रशेखर दातार यांनी ही घोषणा केली.

मार्च 2018 अखेर एसकेएफ क्रेडिट सोसायटी सभासद संख्या 972 एवढी आहे. सभासदांना 9 टक्के व्याज दराने आठ लाख रुपयांपर्यंत दीर्घ मुदतीचे कर्ज, तर 12 टक्के व्याजदराने दहा हजार रुपयांचे अल्प मुदतीचे कर्ज मिळते. पारदर्शीपणा हे सोसायटीचे बलस्थान आहे. आजपर्यंत गेली 52 वर्षे संस्थेने सातत्याने लेखापरीक्षणात (ऑडिट) अ वर्ग मिळविला आहे. पतसंस्थेकडे सोळा कोटी अठ्याणव लाख पस्तीस हजार सातशे रुपयांचे भाग भांडवल असून दोन कोटी सदुसष्ठ लाख सहा हजार आठशे पंचेचाळीस रुपयांचा राखीव निधी आहे.

एसकेएफ सोसायटीच्या वतीने कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्यात प्रामुख्याने ऊर्जा बचतीअंतर्गत पर्यावरणपूरक वॉटर सोलर सिस्टीम, एलईडी बल्ब आणि ट्यूब लाईट यांचे वितरण, पासपोर्ट हेल्पडेस्क, लॅपटॉप आणि बुलेट मोटारसायकल खरेदी योजना आदींचा अंतर्भाव असून दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विशेष नैपुण्य मिळविणाऱ्या सभासदांच्या पाल्यास बक्षीस देऊन गौरविण्यात येते. संस्थेच्या प्रत्येक वर्धापन दिनी वेगवेगळ्या बिगर सरकारी, विनाअनुदानित दोन सामाजिक संस्थांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येते. एखाद्या सभासदाचे निधन झाल्यास वारसास दोन लाख रुपये इतकी मदत दिली जाते. त्यासाठी प्रतिवर्षी 720 रुपये मृत्यूफंड म्हणून जमा केला जातो. त्याचा उपयोग मयत सभासदाच्या कर्जाचा बोजा कमी होण्यास देखील होतो.

सभेमध्ये पंतप्रधान श्रमश्री पुरस्कार प्राप्त झालेले रोलर मॅन्युफॅक्‍चरिंग विभागातील बाजीराव सातपुते यांचा सन्मान संस्थेच्या वतीने करण्यात आला. तसेच सहकार शिक्षणाधिकारी विलास लिंबळे यांनी राखीव निधी या विषयावर मार्गदर्शन केले. चंद्रशेखर दातार यांनी लाभांशाची घोषणा केली. मिलींद श्रीखंडे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला.

एसकेएफ क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष गोविंद शेवते, उपाध्यक्ष चंद्रशेखर दातार, सचिव सुनील आव्हाळे, सहसचिव मिलिंद श्रीखंडे, खजिनदार दीपक लोहार, तज्ज्ञ संचालक नवनाथ तापकीर, व्यवस्थापन समितीचे ज्ञानोबा देवकर, राजेंद्र बोरगे, श्रीपाद नाथी, प्रबोध साळवी, भागवत मोरे, देवेंद्र घोडके, सुरेश शिंदे, जितेंद्र गायकवाड, दीपाली सुतार आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)