पिंपरी – गोथिया कपमधील सहभागाच्या 10 व्या वर्धापन दिनानिमित्त एसकेएफ इंडियातर्फे पिंपरी-चिंचवड महापालिका विभागातील शाळांसाठी एसकेएफ क्रीडा शिक्षण कार्यक्रम आज (गुरुवारी) जाहीर करण्यात आला.

एसकेएफ स्पोर्टस एज्युकेशन प्रोग्राम फॉर स्कूल्स (एसकेएफ शालेय क्रीडा शिक्षण कार्यक्रम) असे नाव असलेल्या या कार्यक्रमाचे उद्‌घाटन एसकेएफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक कार्ल ऑर्सटाडीयस व पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. क्रीडा क्षेत्राच्या माध्यमाद्वारे मुलांमध्ये शारीरिक आणि मानसिक विकास घडवून आणणे हा या उपक्रमामागील हेतू आहे. शालेय विद्यार्थ्यांचा जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू म्हणून विकास घडवून आणण्यासाठी हा कार्यक्रम सहाय्यभूत ठरणार असल्याचा दावा एसकेएफने केला आहे.

या उपक्रमासाठी महापालिकेच्या शाळांमधील 80 मुले आणि मुलींची निवड करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना ते शिकत असलेल्या शाळेत व्यावसायिक प्रशिक्षकांद्वारे आठवड्यातून दोन वेळा फुटबॉल खेळाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. जुलै 2018 च्या शैक्षणिक वर्षात सुरू झालेला हा कार्यक्रम मे 2023 पर्यंत चालणार आहे. या दरम्यान इयत्ता दुसरीपासून मुलांना शिकवण्यास सुरुवात केली जाणार असून ते इयत्ता दहावीमध्ये जाईपर्यंत त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. जस्ट फॉर किक्‍स (जेएफके) तर्फे हे प्रशिक्षण वर्ग घेतले जातील. प्रशिक्षणानंतर 80 जणांच्या प्रत्येक गटातील पाच गुणवान पात्र विद्यार्थ्यांची त्यांच्या गुणवत्ता आणि कामगिरीनुसार निवड केली जाईल. त्यांना एसकेएफ क्रीडा अकादमीमध्ये प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती कार्ल ऑर्सटाडीयस यांनी दिली.

गोथिया कपसाठी संघ जाहीर
एसकेएफ शालेय क्रीडा शिक्षण कार्यक्रमादरम्यान यंदाच्या गोथिया कप फुटबॉल स्पर्धेसाठीचा संघ यावेळी घोषित करण्यात आला. 17 मुले आणि 12 मुली असे दोन संघ यंदा गोथिया कप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. पुणे आणि अहमदाबाद अशा दोन ठिकाणच्या मुला-मुलींचा या संघात समावेश असून त्यांना वर्षभर प्रशिक्षण देऊन तयार करण्यात आले आहे. कम्युनिटी केअर उपक्रमांतर्गत गोथिया कप स्पर्धेत सहभागी होण्याचे एसकेएफचे यंदा दहावे वर्ष आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)