एलईडी प्रकल्पातून ‘टाटा’ला हटविणार

उर्वरीत दिव्यांसाठी नवीन कंपनीला देणार काम : तक्रारींचे प्रमाण वाढल्याने निर्णय

पुणे – वीज बचतीसाठी शहरात सर्व पथदिव्यांना एलईडी फिटींग्ज बसविण्याचा प्रकल्प महापालिकेने हाती घेतला आहे. त्याचे काम कोणत्याही निविदा न काढता थेट टाटा प्रोजेक्‍टस्‌ या कंपनीस देण्यात आला आहे. त्यावरून हे काम देताना मोठ्या प्रमाणात प्रशासकीय त्रुटी राहिल्याने कॅगने या प्रकल्पाबाबत ताशेरे ओढले आहेत. तसेच, हे काम देण्यात आलेल्या कंपनीबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असल्याने या प्रकल्पांतर्गत उर्वरीत फिटींग्ज बसविण्याचे काम टाटा कंपनीला देण्यात येणार नसल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

शहरात सुमारे 1 लाख 31 हजार पथ दिवे असून त्यातील 86 हजार पथदिव्यांच्या फिटींग्ज टाटा कंपनीने बसविल्या आहेत, तर अद्यापही अजून 45 हजार फिटींग्ज बसविण्याचे काम बाकी असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महापालिकेडून शहरातील पथदिव्यांवर एलईडी फिटींग्जनंतर वीज बचत होईल. त्यातील 98.5 टक्के या कंपनीस तर 1.5 टक्के निधी महापालिकेस मिळणार, अशा करारावर हे काम देण्यात आले आहे. कंपनीने गेल्या दीड वर्षांत शहरात जवळपास 86 हजार फिटींग्ज बसविली आहे. तर, बचत झालेल्या वीज बिलापोटी कंपनीस 12 कोटींचा निधी मिळालेला आहे. मात्र, या प्रकल्पांबाबत नगरसेवकांच्या तक्रारी आहेत. अनेक ठिकाणी फिटींग्ज बसविल्या नाहीत. बसविलेल्या फिटिंग्ज बंद आहेत. ज्या कंपनीला हे काम दिले, त्यांना बिल न देता ते इतर कंपनीला दिल्याच्या तक्रारीही नगरसेवकांनी मागील महिन्यात मुख्यसभेत केल्या होत्या. त्यानंतर आयुक्तांनी या कामाच्या निविदांची चौकशी करण्याचे आणि “थर्ड पार्टी ऑडिट’चे आदेश दिले होते. हे ऑडिट सुरू असतानाच आता “कॅग’नेही या योजनेतील त्रुटींवर बोट ठेवले आहे. त्यामुळे प्रशासनाने या कंपनीचे काम थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, उर्वरीत काम नवीन कंपनीस देण्यात येणार असून त्यांनी बसविलेले फिटींग्ज जुन्या स्काडा यंत्रणेला जोडून वीज बचतीची माहिती संकलीत केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

12 वर्षे देखभाल दुरुस्ती टाटाकडेच
महापालिका प्रशासनाने टाटा कंपनीला पुढील काम न देण्याचा निर्णय घेतला असला तरी, ज्या फिटींग्ज टाटाने बसविल्या आहेत, त्यांच्या पुढील 12 वर्षांची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी त्याच कंपनीवर असणार असल्याचे प्रशासकीय सुत्रांकडून सांगण्यात आले, तसेच त्यांनी सध्या शहरात जेवढ्या फिटींग्ज बसविण्यात आल्या आहेत, त्यांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी करून नंतरच त्यांची उर्वरीत बिले दिली जाणार असल्याचेही सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)