एलआयसीच्या नफ्यात मोठी वाढ

मुंबई-भारतीय आयुर्विमा महामंडळाला 2017-18 या आर्थिक वर्षात इक्विटी ट्रेडिंगमधून 25 हजार कोटी रुपयांचा नफा झाला. या सरकारी कंपनीला 2016-17 मध्ये 19 हजार कोटी आणि 2015-16 मध्ये 11 हजार कोटी रुपयांचा लाभ झाला होता. एलआयसीकडून समभाग आणि म्युच्युअल फंड या दोन्ही इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्यात येते. कंपनीने डिसेंबर अखेरपर्यंत 5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक बाजारात केली आहे. ऍसेट अंडर मॅनेजमेंटतर्गत कंपनीच्या नफ्यात 5 टक्क्‌यांनी वृद्धी दिसून आली.

गेल्या वर्षात बाजार विक्रमी पातळीवर पोहोचला होता. यावेळी कंपनीने आपल्याकडील काही हिस्सा विक्रीचा निर्णय घेतल्याने त्याचा फायदा झाला. एलआयसीने 80 हजार कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली आहे. गेल्या वर्षात कंपनीला चांगला नफा झाल्याने पुन्हा बाजारात गुंतवणूक करण्यास मदत होईल. सरकारला लाभांश आणि भागधारकांना नफा काही प्रमाणात वितरित करण्यात येणार आहे. एलआयसीकडून बाजारात गुंतवणूक करण्यात आल्यास पुन्हा तरलता येण्यास मदत होईल आणि बाजार पुन्हा तेजीत येईल.

एलआयसीने नवीन व्यवसाय प्रिमियमच्या माध्यमातून संपूर्ण वर्षभरात 45 हजार कोटी रुपये उभारले आहे. याव्यतिरिक्त वैयक्तिक आणि रिन्यूएबल प्रिमियमसह 2.24 लाख कोटी रुपयांचा एकूण प्रिमियम गोळा केला आहे. कंपनीचा डिसेंबर अखेरपर्यंत ताळेबंद 27.9 लाख कोटी रुपयांचा होता. बाजारात तेजी येण्याचे संकेत मिळताच एलआयसीकडून गुंतवणूक करण्यात येत असल्याने दीर्घकाळ गुंतवणुकीवर सकारात्मक लाभ दिसून येतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)