‘एमपीएससी’ला पाकिस्तानचा पुळका!

उमेदवारांचा आरोप : परीक्षेतील प्रश्‍नावरून संतप्त प्रतिक्रिया

पुणे – पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानचा निषेध होत असताना महाराष्ट्रात मात्र रविवारी झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) एक वेगळाच वाद निर्माण केला आहे. “एमपीएससी’च्या पूर्व परीक्षेत “फेब्रुवारी 2018 मध्ये पाकिस्तानमध्ये कोणत्या मानवाधिकार कार्यकर्त्याचे निधन झाले?’ असा प्रश्‍न विचारण्यात आला आहे. त्यावरून उमेदवारांकडून संतप्त प्रतिक्रया उमटत आहेत.

रविवारी पुण्यासह राज्यात महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट- ब पूर्व परीक्षा झाली. या परीक्षेला राज्यभरातून लाखो उमेदवारांनी परीक्षा दिली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रश्‍न पत्रिकेत “पाकिस्तानच्या मानवाधिकार कार्यकर्त्याचे निधन’ हा प्रश्‍न कोणत्या आधारे घेण्यात आला होता?, असा प्रश्‍न उपस्थित करीत त्याचा खुलासा आयोगाने करावा, अशी मागणी काही उमेदवारांतून होत आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी एअर स्ट्राईक केला. अशा परिस्थितीत आयोगाने वेगळाच प्रश्‍न विचारून नवा वाद ओढावून घेतला आहे. या प्रश्‍नावर काही संघटना आता आयोगाला धारेवर धरण्याची चिन्हे आहेत.

परीक्षेनंतर बायोमेट्रिक हजेरी
पुण्यातील भोर येथील श्री छत्रपती शिवाजी ज्युनिअर व्होकेशनल कॉलेज या परीक्षा केंद्रात एमपीएसीची परीक्षा झाली. तेथे परीक्षा झाल्यानंतर बायोमेट्रिक हजेरी घेतल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. तथापि, परीक्षेत “डमी’ प्रकारावर आळा बसण्यासाठी परीक्षापूर्वी बायोमेट्रिक हजेरी घेणे आवश्‍यक असताना भोर येथील केंद्रात याउलट प्रकार घडला आहे. त्यावरून आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.

जालन्यात “पॅक’ फुटलेले पेपर
जालन्यातील अंबड येथील मत्सोदरी शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात प्रश्‍नपत्रिका “पॅक’ फुटलेले पेपर उमेदवारांना देण्यात आल्याचा प्रकार घडला. मुळात दोन उमेदवारांच्या उपस्थितीत पेपरचा “पॅक’ उघडले जाते. तसे न होता त्यापूर्वीच प्रश्‍नपत्रिका काढण्यात आली. याप्रकाराबाबत उमेदवारांनी तक्रार केली. पण त्याची कोणतीच दखल घेण्यात आल्याचे तेथील केंद्रातील उमेदवारांनी म्हटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here