‘एमटीडीसी रिसॉर्ट’ हाउसफुल्ल

स्वातंत्र्य दिन, पतेती अशा एक दिवसाआड सुट्ट्या : वर्षा पर्यटनाकडे वळली पाऊले

पुणे – हिरवीगार वनराई… पावसाची रिमझिम… धबधब्यांखाली भिजण्याचा आनंद आणि दाट धुक्‍यांच्या छायेत निसर्गाचा अनुभव घेण्यास पर्यटक पसंती देत आहेत. यातच स्वातंत्र्य दिन, पतेती अशा एक दिवसाआड सुट्ट्या आल्याने वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी नागरिकांची हिलस्टेशन, गडकिल्ले, समुद्रकिनारे अशा ठिकाणांकडे पाऊले वळत आहेत. येत्या 31 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची (एमटीडीसी) रिसॉर्ट फुल्ल झाली आहेत.

-Ads-

निसर्ग म्हटला की, सर्वांचीच त्याकडे ओढ लागते. श्रावण ऋतूत निसर्ग अधिकच फुलतो. सर्वत्र हिरवेगार असलेले दृश्‍य, रिमझिम पडणारा पाऊस या सर्वांचा आनंद घेण्याकडे नागरिकांचा कल आहे. सलग जोडून येणाऱ्या सुट्ट्या यांचे नियोजन एक महिना आधी तयार होते. त्यानुसार सुट्ट्यांमधील एमटीडीसीच्या रिसॉर्टचे बुकींग मागील एक महिन्यांपूर्वीच झाले. सहकुटुंब, मित्र, नातेवाईक यांच्यासह पर्यटनाला जाण्याचा कल वाढत आहे. शहरातील धावपळीच्या जीवनातून वेळ काढून निसर्गाच्या सानिध्यात जाण्यास नागरिक पसंती देत आहेत. माळशेज, माथेरान, महाबळेश्‍वर या ठिकाणांबरोबरच कोकणात जाण्याकडे जास्त कल वाढत आहे. यामुळे एमटीडीसीच्या तारकर्ली, आंबोली, हरिहरेश्‍वर, वेळणेश्‍वर, गणपतीपुळे, महाबळेश्‍वर, माथेरान, कार्ला, माळशेज येथील बुकींग फुल्ल झाले आहेत. पावसाचा आनंद घेण्यासाठी काहींनी माळशेज, माथेरान, लोणावळा, महाबळेश्‍वर, पाचगणीला पसंती दिली आहे. तर, गड किल्ल्यांचे हौस असणाऱ्यांनी रायगड, प्रतापगड, शिवनेरी, राजगड गाठण्याचे ठरविले आहे. समुद्रकिनाऱ्याची ओढ असणाऱ्यांनी अलिबाग, गणपतीपुळे, दिवेआगार या स्थळांची निवड केली आहे.

स्थानिकांकडून निवास-न्याहारीची व्यवस्था
एमटीडीसीचे रिसॉर्ट जरी फुल्ल झाले असले तरी निवास-न्याहारीची व्यवस्था स्थानिक नागरिकांकडून केली जाते. स्थानिक नागरिकांना रोजगार मिळावा आणि पर्यटकांची सोय व्हावी, यासाटी ही सुविधा निर्माण केली आहे. निवास न्याहारीची व्यवस्था कोठे आहे, याबाबतची माहिती एमटीडीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटक या ठिकाणी बुकींग करून राहण्याची व्यवस्था करू शकतात, अशी माहिती एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)