एमकेसीएलकडून महालाभार्थी वेब पोर्टल विकसित

शासकीय योजनांसाठी अशाप्रकारची सुविधा देणारे देशातील पहिलेच राज्य

कराड – केंद्र व राज्य सरकारने जाहीर केलेल्या 300 हून अधिक योजनांसाठी एमकेसीएलने महालाभार्थी हे वेब पोर्टल विकसीत केले आहे. अशा प्रकारच्या वेब पोर्टलची निर्मिती करणारे देशातील महाराष्ट्र हे पहिलेच राज्य आहे. शासकीय सेवा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हे पोर्टल तयार केले असल्याची माहिती एमकेसीएलचे वरिष्ठ अधिकारी विवेक सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कराड येथील सनबिम इन्फोकॉमचे सारंग पाटील, अतुल गावंडे उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत अधिक माहिती देताना सावंत म्हणाले, नागरिक महालाभार्थी.इन या वेबसाईटला भेट देवून एमकेसीएल आणि राज्य सरकारच्या अभिनव उपक्रमाचा लाभ घेऊ शकतील. या साईटवर जाऊन नागरिकांना सर्वप्रथम आपला लॉगिन आयडी तयार करावा लागेल. आपली माहिती एंटर केल्यानंतर आपल्या गरजेनुसार पोर्टल आपण पात्र ठरत असणाऱ्या योजनांची माहिती सांगते. पात्र योजनांची यादी, मिळू शकणारे लाभ, त्यासाठी अर्ज कसा करायचा, सोबत कोणती कागदपत्रे जोडायची याची संक्षिप्त माहिती एका प्रिंटच्या माध्यमातून देण्यात येते. या प्रिंटसोबत नागरिकाच्या नावाने उद्‌देशून तयार केलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पत्रही दिले जाते.

ही वेबपोर्टलची सेवा पूर्णपणे मोफत आहे. एमकेसीएल च्या इतर उपक्रमांबाबत माहिती देताना सावंत यांनी पुढे सांगितले की, व्यावसायिक क्षेत्रातील बदलत्या गरजांना अनुसरुन एमएससीआयटी कोर्स मध्येही अनेक बदल करण्यात आले आहेत. हा अभ्यासक्रम अधिकाधिक रोजगारक्षम बनवण्यात आला आहे. यामध्ये सायबर फ्रॉड, क्राईम, हॅकिंगपासून बचाव, उपयुक्‍त मोबाईल ऍप्स, विविध वेबसाईट्‌स आदींचीही माहिती या कोर्सच्या माध्यमातून विद्‌यार्थ्यांना देण्यात येणार आहे. एमएससीआयटी कोर्सचा आतापर्यंत 1.25 कोटी विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे. एमएससीआयटीच्या धर्तीवर देशातील अनेक राज्यांनीही आपले अभ्यासक्रम सुरु केले आहेत.

विद्‌यार्थ्यांना आत्मविश्‍वासासोबत इंग्रजी संवाद कौशल्य, भाषा शिक्षण, शब्द रचना, सॉफ्ट स्किल्स, स्वयंव्यवस्थापन अशा विविध विषयांचे एकत्रित प्रशिक्षण देणारा क्‍लिक इंग्लिश हा अभ्यासक्रमही एमकेसीएलने तयार केला आहे. या कोर्समध्ये विद्‌यार्थ्यांना शाब्दीक तसेच देहबोली कौशल्येही शिकवण्यात येतात. विद्‌यार्थ्यांना वैयक्‍तिक तसेच व्यावसायिक क्षेत्रात यश मिळवून देण्यासाठी क्‍लिक इंग्लिश अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. पाचवी ते नववीच्या विद्‌यार्थ्यांसाठी आजच्या शैक्षणिक पध्दतीला अनुसरुन काळाशी सुसंगत, रचनावादी आणि विद्‌यार्थ्यांच्या कृतीशील सहभागाला प्रोत्साहन देणारे एमकेसीएल ईस्कूल हे शैक्षणिक दालन सुरु केले आहे.

केंद्र व राज्य सरकारने जाहीर केलेल्या 300 हून अधिक योजनांसाठी एमकेसीएलने महालाभार्थी हे वेब पोर्टल विकसीत केले आहे. या माध्यमातून सर्व शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. ही सेवा पूर्णपणे मोफत असून याचा नागरिकांनी लाभ घ्यावा.
विवेक सावंत
वरिष्ठ अधिकारी, एमकेसीएल


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)