‘एमएच 42’च्या कार्यालयीन कामाचे ‘वाजले 12’

संग्रहित छायाचित्र

बारामती, दौंड, इंदापुरसह इत्ररत्रहून येणाऱ्या चालक-मालकांना वाहन तपासणी पत्रासाठी करावी लागते पळापळ


 शोरूमवाल्यांकरिता बसल्याजागी पुरवली जाते सेवा

जळोची – बारामती, दौंड आणि इंदापुर तालुक्‍यातील वाहनांकरिता बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सोयीचे ठरत असल्याने या ठिकाणी दररोजचा मोठी वर्दळ असते. येथे ब्रेक टेस्ट ट्रॅक नसल्याने गेल्या चार महिन्यांपासून वाहनांची योग्यताप्रमाण पत्रांच्या तपासणीचे काम बंद होते. मेडद येथे हा ट्रॅक उभारण्यात आल्यानंतर काम वेगाने होईल, अशी अपेक्षा असताना संबंधीत अधिकारी मात्र स्वत:च्या वेळेनुसार काम करीत असल्याने वाहन चालक-मालकांना कार्यालयात फेऱ्या माराव्यात लागत आहेत. तर नवीन वाहनांच्या शोरूमवाल्यांची कामे मात्र बसल्याजागी पुर्ण करून दिली जात असल्याने एमएच 42च्या कामाचे वाजले 12 अशीच चर्चा आता सर्वत्र रंगू लागली आहे.

याबाबत ‘प्रभात’ने माहिती मिळविलेली माहिती अशी की, न्यायालयीन आदेशानुसार वाहनांच्या योग्यताप्रमाण पत्रांची तपासणी 250 मीटरच्या ब्रेकटेस्ट ट्रॅकवर करणे बंधनकारक आहे. परंतु, बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास ब्रेक टेस्ट ट्रॅक नसल्याने गेल्या चार महिन्यांपासून वाहनांच्या योग्यताप्रमाण पत्रांच्या तपासणीचे काम बंद होते. मेडद (ता. बारामती) येथे जागा उपलब्ध झाल्यानंतर तेथे ब्रेकटेस्ट ट्रॅक तयार करण्यात आला. या ठिकाणी डिसेंबर 2017 पासुन दररोज 20 वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्रांच्या वाहनांची तपासणी सुरु करण्यात आली. तर जानेवारी 2018 मध्ये त्यामध्ये वाढ करून 25 वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. परंतु, गेल्या चार ते पाच माहिन्यांपासुन वाहनांच्या योग्यताप्रमाण पत्रांची तापासणी रखडली आहे.

-Ads-

न्यायालयाच्या आदेशानुसार दररोज एक मोटार वाहन निरीक्षक व सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, असे दोघे मिळून 30 वाहनांची तपासणी करू शकतात. तसेच अत्यावश्‍यक सेवेमध्ये येणारी ऍम्ब्युलंस, दूध टॅंकर, पेट्रोल टॅंकर, डिझेल टॅंकर, स्कूल बस या वाहनांची तपासणी तत्काळ करून देणे कायद्यानेही बंधनकारक आहे. मात्र, परिवहन कार्यालयातील मोटर वाहन निरीक्षक फक्त 25 वाहनांची तपासणी करून हात झटकण्याचे काम करीत आहेत. विशेष म्हणजे दररोज अपॉयमेंट घेतल्यापैकी 25 वाहन चालक-मालक येत नाहीत किमान 4 ते 5 वाहने तरी कमीच असतात, तरीही रोजच्या तपासणी कामाचा कोटा पुर्ण केला जात नाही. या उलट मोटार वाहन निरीक्षक वाहने तपासणीचे काम लवकर बंद करतात. शासकीय वेळेनुसार वाहनांच्या योग्यताप्रमाण पत्रांची तपासणी करण्याचे काम मेडद येथील ब्रेकटेस्ट ट्रॅकवर सकाळी 9 वाजून 45 मिनिटांपासुन ते सायंकाळी 5 वाजून 45 मिनिटांपर्यंत होणे बंधनकारक आहे, असे असूनही मोटार वाहन निरीक्षकांनी मात्र आपल्या सोयीनुसार ही वेळ दुपारी 12 व त्यानंतरची ठेवत आहेत.

वाहन निरीक्षक कामावर आले की, एक दीड तास वाहनांची कागदपत्रे तपासण्यात जातो, त्यानंतर “शासकीय ब्रेक’ घेऊन हे अधिकारी तास दिड तास पुन्हा गायब होतात, या सगळ्यातून वाहनाचे तपासणी पत्र तयार झाले तरी ते तातडीने मिळत नाही. वाहनांचे तपासणी पत्र घेण्यासाठी गेल्यास दुसऱ्या दिवशी आले तरी मोटार वाहन निरीक्षक सोयीस्कररित्या भेटतात. संबंधीत शिपायांकडे कागदपत्रांची चौकशी करण्याकरिता सांगितले जाते. त्यानुसार शिपायाकडे विचारणा केली असता वाहनांची तपासणी पत्र (फिटनेस) रात्री निघतात, उद्या या, असे सांगितले जाते. अखरे वैतागुन तपासणी पत्र काढण्यासाठी सर्व कागदपत्र खासगी व्यक्तीच्या ताब्यात देऊन त्याला आपला पासवर्ड देऊन त्या व्यक्तिकडून तपासणी पत्र काढून घेण्याशिवाय पर्याय नसतो, या सगळ्या प्रक्रियेत वेळ आणि अधिकचा पैसा वाया जात असल्याने बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील या कामाची खाते निहाय चौकशी करण्याची मागणी वाहन चालक-मालकांकडून होवू लागली आहे.

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या सोलापुर उपप्रादेशिक परिवहन कायार्पलयात दररोज 150 वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्रांची तपासणी केली जाते. तेथे वाहनांची तपासणी होताच वाहनांचे तपासणी पत्र अवघ्या 20 मिनिटांत वाहन मालकाच्या ताब्यात कागदपत्रांसह दिले जाते. मात्र, बारामतीच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात फक्त 25 वाहनांचीच तपासणी केली जाते शिवायस फिटनेस व कागदपत्र त्याच दिवशी दिले जात नाही. विशेष म्हणजे नविन वाहनांचे तपासणी पत्र शहरातील शोरूमवाल्यांना बसल्याजागी देण्याची खास व्यवस्था येथील काही अधिकाऱ्यांनी केली आहे. हा सगळा कारभार गेली कित्येक वर्षे एकच जण बिनसरकारी फुलपगारी व्यक्ती करीत आहे.

बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सोडले तर महाराष्ट्र राज्यातील इतर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दररोज 100 ते 150 वाहनांची तपासणी केली जाते. मनुष्यबळ असो किंवा नसो याचा विचार न करता वाहन मालकांची अडवणूक होऊ नये याची दक्षता घेतली जाते. वास्तविक, बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मनुष्य बळ कमी नाही. लोकसेवक मोटार वाहन निरीक्षक यांची संख्या 6 आहे. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांची संख्या 3 आहे. तर एक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आहे व एक सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आहेत, असे एकूण 11 अधिकारी आहेत. तरीही त्यांच्याकडून वेळेत काम होत नसल्याचे येथे येणाऱ्या वाहन चालक-मालकांचे म्हणणे आहे. बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील शासकीय अधिकाऱ्यांनी वेळ वाया न घालविता काम केले तर येथील कार्यालयातील अभिलेखावर असणाऱ्या सर्व वाहनांची व योग्यताप्रमाण पत्रांची तपासणी लवकरच पूर्ण होईल व वाहन मालकांची उभी असलेली वाहने पुन्हा नव्या जोमाने रस्त्यावर धावतील, अशी अपेक्षा वाहन चालक-मालक व्यक्त करीत आहेत.

…अधिकाऱ्यांची मनमानी
वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्रांची तपासणी चार माहिन्यांपासुन राखडलेली असल्याने हजारो वाहन मालकांची वाहने एका जागेवर उभी आहेत. वाहने उभी असल्याने वाहनांवरील असणारे बॅंकेच्या कर्जाचे हप्ते रखडले आहेत. बॅंकाचे हप्ते न गेल्याने वाहन मालकांची वाहने बॅंका ताब्यात घेत आहेत, त्यामुळे वाहन मालक अडचणीत आले आहेत.

ज्यांची परिस्थिती चांगली आहे. ते आपले वाहन तपासणी करण्यासाठी राज्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापुर, अकलूज, नांदेड, श्रीरामपुर, अहमदनगर, सातारा, कराड, पुणे, पिपरी चिंचवड अशा अनेक ठिकाणी जातात. परंतु, याकरिता इंधनाचा तसेच अन्य खर्च वाढतो. परंतु, बारामती वगळता अन्यत्र 20 मिनीटांत वाहन तपसणी पत्र मिळत असल्याने हा वाढीव खर्च परवडत असल्याचे सर्वांचे म्हणणे आहे. विशेष, वाहन मालकांनी त्यांच्या सोयीनुसार पुणे, अकलूज, पिपरी चिंचवड, अहमदनगर किंवा राज्यातील कोणत्याही आरटीओ कार्यालयातून बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नावाने वाहनाचे योग्य तपासणी प्रमाणपत्र आणले असता बारामतीचे वाहन निरीक्षक असे बाहेरील प्रमाणपत्र ग्राह्य धरतच नाहीत, यामुळे बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालय हे महाराष्ट्र राज्यातच आहे की? बाहेर? असा प्रश्‍न वाहन मालकांना पडू लागला आहे.

वाहनांची फिटनेस तपासणी कशी…
प्रादेशिक, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील एक वरिष्ठ अधिकारी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी हे स्वतः योग्यता प्रमाणपत्रांच्या वाहनांची तापासणी करतात. स्वतः वाहनाच्या चासी जवळ जावून वाहनांच्या चासीचा नंबर तपासून तो कागदपावर उमटविला जातो. वाहनांचे (फिटनेस) योग्यता प्रमाण पत्र दिले जाते. दररोज, किमान 50 वाहनांची तपासणी करण्याची क्षमता असताना बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मात्र, मनुष्यबळ कमी असल्याच्या नावाखाली वाहन मालकांची अडवणूक केली जात आहे.

वाहन मालक त्यांच्या सोयीनुसार
महाराष्ट्र सरकारच्या आदेशानुसार राज्यातील कोणत्याही आरटीओ कार्यालयात वाहनाच्या योग्यताप्रमाण पत्रांची तपासणी चालक-मालक करू शकतात. त्यामुळे बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सुद्धा वाहनांच्या योग्यता प्रमाण पत्रांची तपासणी तीही वेळेत केलीच पाहिजे.
– दत्तात्रय सांगोलकर, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, बारामती

वाहन मालक त्यांच्या सोयीनुसार महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही आरटीओ कार्यालयात वाहनाच्या योग्यताप्रमाण पत्रांची तपासणी करू शकतात. बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात बाहेरून परवानगी घेऊन आल्यास व वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्रांची तपासणी न केल्यास सबंधीत अधिकाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
– बाबासाहेब आजरी, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)