“एमआयटी’त शिवाजी महाराज की जय…

लोणीकाळभोरच्या विश्‍वराजबाग घुमट परिसरात बसविणार अश्‍वारूढ पुतळा

लोणी काळभोर – लोणीकाळभोरच्या विश्‍वराजबाग येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व एमआयटी एडीटी विद्यापीठ परिसरात जगातील सर्वात मोठे घुमट उभारण्यात आले. यामध्ये जगातील महापुरूषांचे पुतळे बसविण्यात आले होते. मोठ्या चर्चेअंती येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात येत असून आज संस्थेच्या आवारात महाराजांच्या पुतळ्याचे आगमन ढोलांच्या गजरात होताच छत्रपती शिवाजी महाराज की जय…जयघोष झाला.
हिंदवी स्वराज्याचे आराध्य दैवत, युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचे शिवजयंतीच्या दिवशी म्हणजेच दि. 19 फेब्रुवारी 2019ला जगातील सर्वात मोठ्या घुमट परिसरात, विश्‍वराजबाग, लोणी काळभोर येथे लोकार्पण होणार असल्याचे एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड यांनी सांगितले. येथे येणाऱ्या पर्यटकांना सर्व प्रथम महाराजांचे दर्शन घडविण्यासाठी हा अश्‍वारूढ पुतळा बसविण्यात येत आहे. त्याच प्रमाणे येथील विद्यार्थ्यांना सतत महाराजांच्या कार्यांची प्रेरणा मिळत राहावी. यासाठी हा पुतळा बसविण्यात येत आहे. महाराजांचा पुतळा बसविण्याचा संकल्प होता. तो आज पूर्ण झाला, असेही कराड यांनी सांगितले.
राजबाग, लोणी काळभोर येथील कॅम्पसमध्ये महाराजांच्या पुतळ्याचे आगमन ढोल ताशाच्या गजरात झाले. त्यानंतर प्रा. डॉ. कराड यांच्या हस्ते विधीवत पूजा करून वंदन करण्यात आले. यावेळी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.मंगेश कराड, कुलगुरू डॉ. सुनील राय, तुळशीराम कराड, काशीराम कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन. पठाण, हवेली पंचायत समितीचे सदस्य युगंधर उर्फ सन्नी काळभोर, लोणी काळभोर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद काळभोर, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष विठ्ठल काळभोर, राष्ट्रवादीचे युवानेते कमलेश काळभोर, ग्रामपंचायत सदस्य अण्णासाहेब काळभोर, माजी उपसरपंच कृष्णा पवार, माजी सदस्य संतोष गायकवाड आदी उपस्थित होते.

  • पुतळ्यासाठी दोन टन ब्रॉंझ…
    हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अश्‍वारूढ असून त्याची उंची 15 फूट आहे. या पुतळ्याची निर्मिती प्रसिद्ध शिल्पकार निलेश खेडकर यांनी केली आहे. जवळपास दोन टन ब्रॉंझचा वापर करून त्याची निर्मिती केली आहे. राजबाग, लोणी काळभोर येथील कॅम्पसच्या प्रवेश द्वाराच्या आतमध्ये आल्यावर प्रथम महाराजांचे दर्शन होईल. त्यांना पाहिल्यावर संपूर्ण जगात भारत मातेचा संदेश देणाऱ्या या भूमीची महती जनतेला कळेल.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)