एफसी पुणे सिटी संघात क्रोएशियनचा मध्यरक्षक डॅमिर ग्रेगिक याचा समावेश 

प्रभात वृत्तसेवा 
पुणे – राजेश वाधवान समूह आणि ह्रतिक रोशन यांच्या सहमालकीच्या, तसेच इंडियन सुपर लीग स्पर्धेतील प्रमुख संघ असलेल्या एफसी पुणे सिटी संघाने अव्वल मध्यरक्षक डॅमिर ग्रेगिक याला करारबद्ध केले आहे. 2017-18या मोसमासाठी क्रोएशियाचा डॅमिर ग्रेगिक हा इंडियन सुपर लीग मध्ये पहिल्यांदाच सहभागी होत आहे.

एफसी पुणे सिटी संघात डॅमिर ग्रेगिक याचा समावेश केल्याची अधिकृत घोषणा एफसी पुणे सिटी संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव मोडवेल यांनी आज केली. मोडवेल म्हणाले की, स्लोव्हेनियामध्ये उत्कृष्ट कामगिरी करून डॅमिर संघात सहभागी झाला आहे. तो अतिशय ताकदवान आणि आक्रमक खेळाडू असून त्याच्या संघातील समावेशामुळे संघाची ताकद वाढणार आहे. तसेच, चेंडू अचूक पास करणे आणि चेंडूचा ताबा मिळविणे या दोन्हींमध्ये त्याचा हातखंडा आहे.

डॅमिर याने 2010मध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात क्रोएशियाच्या प्रथम श्रेणी विभागांतील एनके कार्लोवक संघाकडून केली आणि त्यांनतर तो जर्मनीतील व्हीएफएल बाऊचम संघात सहभागी झाला. 2015पासून त्याने स्लोव्हेनियन प्रावलिगा स्पर्धेत एनके रुदर वेलेंजे संघाचे प्रतिनिधित्व केले होते. यावेळी डॅमिर ग्रेगिक म्हणाला की, भारतात येऊन इंडियन सुपर लीग स्पर्धेत एफसी पुणे सिटी संघाकडून खेळण्यास मी फार उत्सुक आहे. माझ्या व्यावसायिक कारकिर्दीत मी सर्वाधिक काळ युरोपमध्ये खेळलो असल्यामुळे माझ्यासाठी हे एक नवे आव्हान असणार आहे. परंतु मी संघाला विजय मिळवून देण्यासाठी उत्सुक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)