‘एफआरपी’शिवाय गळीत हंगाम सुरू होऊ देणार नाही

शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका : 12 कारखान्यांनी थकविले 220 कोटी रु.

पुणे – यंदाचा गळीत हंगाम पुढील आठवड्यापासून सुरू होत आहे. त्यात राज्यातील 12 साखर कारखान्यांनी गेल्या हंगामातील “एफआरपी’ अर्थात रास्त आणि किफायतशीर किंमतीचे पैसे शेतकऱ्यांना दिलेले नाही. काही कारखान्यांकडे मिळून तब्बल 220 कोटी रुपयांची थकबाकी आहे. ती मिळाल्याशिवाय गळीत हंगाम सुरू होऊ देणार नाही, अशी भूमिका आता शेतकऱ्यांनी घेतली आहे.

गेल्या वर्षी उसाचे विक्रमी उत्पादन झाल्याने गळीत हंगाम मेअखेर सुरू होता. साखर निर्मितीत महाराष्ट्राने विक्रम केला. तर, दुसरीकडे शेतकऱ्यांना अनेक कारखान्यांनी अजून “एफआरपी’चे पैसे दिले नाहीत. “नंतर देऊ’, “हप्त्या-हप्त्याने देऊ,’ असे सांगत साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना झुलवत ठेवले आहे. आता तर 20 ऑक्‍टोबरपासून चालू वर्षीचा गळीत हंगाम सुरू होत आहे. या वर्षीच्या “एफआरपी’बाबत चर्चा करण्यापूर्वी शेतकरी आता थकीत “एफआरपी’ आधी देण्याची मागणी करत आहेत.

साखर आयुक्ताकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील 12 कारखान्यांकडे अजून थकबाकी आहे. त्यात सोलापूर, सातारा कोल्हापूर, सांगली, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातील कारखान्यांचा समावेश अधिक आहे. सर्वाधिक म्हणजे 47 कोटी रुपयांची थकबाकी न्यू फलटण शुगर्स कारखान्याकडे आहे. बीड- जय महेश शुगर कारखान्याकडे 38 कोटी रुपये थकले आहेत. या दोन्ही कारखान्यांवर कारवाईचे आदेश साखर आयुक्तालयाने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. पण, सहकारमंत्र्यांनी या आदेशाला स्थगिती दिली. त्यामुळे आता यापुढील सुनावणी ही सहकारमंत्र्यांसमोर आहे.

थकबाकी असलेले अन्य कारखाने
शंभू महादेव कारखाना- उस्मानाबाद, माणगंगा सहकारी साखर कारखाना-सांगली, जय भवानी सहकारी कारखाना-बीड, श्री सिद्धेश्‍वर सहकारी कारखाना- सोलापूर, मातोश्री लक्ष्मी शुगर-सोलापूर, गोकूळ शुगर-सोलापूर, श्री मकाई कारखाना- सोलापूर, फेन ऍग्रो-सांगली, चोपडा शेतकरी सहकारी कारखाना- जळगाव या कारखान्यांनी “एफआरपी’ थकविली आहे.

शेतकरी म्हणतात…
चालू वर्षाचा गळीत हंगाम पुढील आठवड्यापासून सुरू होत आहे. गेल्या वर्षीची “एफआरपी’ मिळालेली नाही. त्यात आता चालू गाळप हंगामाचे पैसे कधी मिळणार? असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. साखर आयुक्तालयाने याबाबत तातडीने काही मार्ग काढावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)